Unlock : कोल्हापूर शहरातील निर्बंध इतक्या दिवसांसाठी हटवले, फटाके फोडून स्वागत

राज्यात सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तिथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता या शहरातील निर्बंध आठ दिवसांसाठी हटवले गेले आहेत. 

Updated: Jul 5, 2021, 10:59 AM IST
Unlock : कोल्हापूर शहरातील निर्बंध इतक्या दिवसांसाठी हटवले, फटाके फोडून स्वागत title=

कोल्हापूर : राज्यात सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus) वाढत असल्याने तिथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. मात्र, या ठिकाणी व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. दरम्यान, कोल्हापूर ( Kolhapur) शहरातील निर्बंध आठ दिवसांसाठी हटवले गेले आहेत. या निर्णयानंतर सर्व दुकाने खुली झाली असून व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

व्यापाऱ्यांच्या दुकाने खुली करण्याच्या ठाम भूमिकेनंतर अखेर आजपासून कोल्हापूर आठ दिवसांसाठी खुली झाली आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत ही सूट दिलीय. त्यानंतर कोल्हापुरातल्या रूग्णस्थितीचा आढावा घेऊन सरकार पुढचा निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

आजपासून कोल्हापुरात दुकाने खुली होणार आहेत. अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू राहतील. असे असले तरी कोल्हापूर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये, सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.  

दरम्यान, सरकारच्या निर्णयाच कोल्हापुरातील दुकानदारांनी स्वागत करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला आहे. शहरातील महाद्वार रोड इथं दुकानदारांनी हा आनंदोत्सव साजरा केला.