Maharashtra Politics : माझा स्वभाव वाईट, संजय राऊतांना सोडणार नाही; नारायण राणे यांचा इशारा

Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर 102 दिवस आर्थर रोड तुरुंगात काढावे लागले होते. यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला होता

Updated: Jan 6, 2023, 09:58 AM IST
Maharashtra Politics : माझा स्वभाव वाईट, संजय राऊतांना सोडणार नाही; नारायण राणे यांचा इशारा title=

Sanjay Raut : पत्राचाळ जमीन गैरव्यवहार (patra chawl scam) प्रकरणी अटक झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला. 102 दिवस आर्थर रोड तुरुंगात (arthur road jail) राहिल्यानंतर अखेर न्यायालयाने संजय राऊतांना दिलासा दिला होता. 31 जुलै 2022 रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊत हे विरोधकांवर तुटून पडले आहेत. अशातच संजय राऊत पुन्हा एकदा जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला आहे. 

संजय राऊत यांच्यासाठी रस्ता मोकळा करत आहे - नारायण राणे

"नारायण राणेंवर बोललो की ब्रेकिंग न्यूज होते. माझ्याकडे कात्रणं आहेत. मी वाचून विसरणारा नसून दखल घेणारा आहे. माझा वाईट स्वभाव आहे. 26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवला आहे. संजय राऊत यांना सोडणार नाही. मी सुद्धा त्यांच्यावर केस टाकणार आहे. 100 दिवस आत राहिले आता त्यांना वाटतं परत आत जावं. मी रस्ता मोकळा करत आहे परत जाण्यासाठी," असा गर्भित इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

नारायण राणेंनी उल्लेख केलेल्या अग्रलेखात काय आहे?

"नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर श्री. फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत. आमदार महेश शिंदे म्हणताहेत, ‘‘आम्ही खोके घेतले.’’ मग हा चौकशीचा विषय ठरू नये? आश्चर्यच आहे. सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री. फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले 100 सांगाडे ‘पुरावे’ म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील, पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत," अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आला होता.