ठाणे : उल्हासनगरमध्ये ओटी सेक्शन येथे एका वाहतूक पोलिसाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रावसाहेब काटकर असे मारहाण करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. काटकर हे ओटी सेक्शन तीन रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना अप्पा मुंढे हा तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट येत होता. त्याला कारवाई करण्यासाठी अडवले असता पोलीस काटकर याच्या हाताला त्याने झटका देत दुचाकी पुढे नेली.
बाईकला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या हातातून पावती पुस्तक खाली पडले. वाहतूक पोलीस जमिनीवर पडलेले पावती पुस्तक आणि टोपी उचलण्यासाठी वाकले असताना या दुचाकीवरील अप्पा मुंढे याने त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार होत असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र वार्डनने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं. याप्रकरणी पोलिसांनी आप्पा मुंडे याला अटक केली आहे.