ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं महत्त्वाचं पाऊल

सर्व फटाक्यांची ध्वनिक्षमता १४५  डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती

Updated: Oct 27, 2018, 09:42 PM IST
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचं महत्त्वाचं पाऊल title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या फटाक्यांची ध्वनिचाचणी  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने घेण्यात आली. यावेळी बाजारात उपलब्ध फटाक्यांपैकी १८ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये एक हजार, पाच हजारच्या माळा, सुतळीबॉम्ब, आकाशात जाऊन फुटणारे फटाके यांची चाचणी ध्वनिमापक यंत्राद्वारे घेण्यात आली.

आवाजाची मर्यादा 

या सर्व फटाक्यांची ध्वनिक्षमता १४५  डेसिबलपेक्षा कमी असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. उल्हासनगर  येथील सेंचुरी रेयॉन च्या  मैदानावर ही  फटाक्यांची नमुना चाचणी घेण्यात आली. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांवर १४५ डेसिबल आवाजाची मर्यादा घातली असून, या मर्यादेपलीकडे आवाज करणाऱ्या फटाक्यांची बाजारात विक्री होत आहे का ? याची चाचपणी करण्यासाठी अशाप्रकारे बाजारातून फटाक्यांचे नमुने घेऊन त्याची चाचणी ध्वनिमापन यंत्रणा द्वारे करण्याचे येते. 

अहवाल सादर करणार 

 'कोणत्या फटक्यांनी आवाजाची तीव्रता गाठली ? आणि कुठले फटाके ध्वनिप्रदूषण करतात ? याची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार असून तोच अहवाल महापालिका आणि पोलिसांना सादर केला जाणार आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदीच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे', कल्याण मंडळाचे विभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी दिली.