शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा (Afzal Khan) वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं लवकरच भारतात परतण्याची शक्यता आहे. ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 8, 2023, 11:54 AM IST
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी title=

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास जेव्हा कधी सांगितला जातो, तेव्हा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत केलेला वध या घटनेचा उल्लेख साहजिकपणे होतो. महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, ती सध्या ब्रिटनमध्ये आहेत. यासह महाराजांची जगदंबा तलवारही ब्रिटनमध्येच आहे. राज्य सरकार मागील अनेक काळापासून ही तलवार आणि वाघनखं मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. कारण ब्रिटनने वाघनखं परत करण्यास तयारी दर्शवली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

ब्रिटनने वाघनखं आपल्याला परत करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात आपण इंग्लंडला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ही वाघनखं सध्या अल्बर्ट म्युझिअममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. सुधार मुनगंटीवार यावेळी विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझिअमसह सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. 

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे की "जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर वाघनखं यावर्षीच पुन्हा महाराष्ट्रात परत येतील. आम्हाला युके प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परत करण्यास तयार असल्याचं पत्र मिळालं आहे. हिंदू कॅलेंडप्रमाणे ज्या दिवशी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता, त्या दिवशीच ही वाघनखं परत आणली जातील. याशिवाय इतर तारखांचाही विचार केला जात आहे. तसंच वाघनखं भारतात परत कशी आणायची यावरही चर्चा सुरु आहे".

"सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त आम्ही इतर गोष्टींचीही चाचपणी करत आहोत. शिवाजी महाराजांची जगदंबा तलवारही परत मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान वाघनखं परत येत आहेत हे महाराष्ट्रासाठी फार मोठं यश आहे. ग्रेगोरियन कँलेंडरनुसार अफजल खानाचा वध केल्याची तारीख 10 नोव्हेंबर आहे. पण आम्ही हिंदू तिथीनुसार येणाऱ्या तारखांचाही विचार करत आहोत," असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. 

"छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं हा इतिहासातील अमूल्य ठेवा असून अनेकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही वाघनखं अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षेत आणणं गरजेचं आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

वाघनखं परत आणण्यासाठी तीनजणांचं पथक लंडनला जाणार आहे. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश आहे. तीन सदस्यांच्या लंडन दौऱ्यासाठी 50 लाख खर्च केले जाणार आहेत. 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान हा दौरा केला जाणार असल्याची माहिती आहे.