यवतमाळ : मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली आघाडी अपवित्र असल्याचा हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. यवतमाळ येथे बोलताना अहीर म्हणाले की, 'काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे विचार कुठेही जुळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावातच राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवाद कुठेही दिसत नाही. केवळ सत्तेसाठी तिघेही एकत्र आले आहे. त्यांचे विचार, कार्यक्रम कुठेही जुळत नाही. भाजप, शिवसेना यांनी राममंदिर, हिंदुत्व हा मुद्दा घेऊन लढा दिला.'
'बाळासाहेब ठाकरे आम्हाला पूजनीय आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र, विचारांचे वारसदार ठरतात. त्यांनी भगवे कपडे घालून घेतलेली शपथ काँग्रेस नेत्यांना बघवली नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडी खूप दिवस टिकणार नाही,' असा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला.
दरम्यान आज विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर आक्षेप घेतला. तर मुख्यमंत्री ठाकरेंनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप फडणवीसांनी केलं. तर त्याला उद्धव ठाकरेंनी ही सडेतोड उत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंच्या घेतलेल्या नावाला विरोधकांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ विहीत नमुन्यातली नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. शपथच कायदेशीर नसल्यानं त्यांचा परिचयही बेकायदा असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
भाजपच्या या आक्षेपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं. महापुरूषांचं नाव घेतल्यावर इंगळी का डसली असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना विचारला.