'‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा'

Uddhav Thackeray Shivsena On Idris Naikwadi: "भाजपातील केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा निष्ठावंतांना फक्त सतरंज्याच उचलायची जबाबदारी देऊन उपऱ्यांना व ‘वंदे मातरम्’विरोधकांना आमदारक्या बहाल केल्या जात आहेत."

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 19, 2024, 07:07 AM IST
'‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे..', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात 'वंदे मातरम्'चा सौदा' title=
ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Shivsena On Idris Naikwadi: "भाजप व त्यांच्या मिंधे टोळीचे हिंदुत्व म्हणजे ढोंग आहे. सत्तेसाठी या बोटावरील थुंकी त्या बोटावर करण्यात या मंडळींचा हात कोणीच धरणार नाही. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे घाईघाईने उरकलेला राज्यपाल नियुक्त सात सदस्यांचा शपथविधी सोहळा. या नियुक्त्या व त्यांचा शपथ सोहळा संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. पुन्हा या सातजणांत असे अनेक जण आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचार व देशद्रोहाचे, हिंदूविरोधी कृती केल्याचे आरोप आहेत. त्यांनाही राज्यपालांनी शपथ दिल्याने सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व आणि देशभक्तीचे मुखवटे गळून पडले आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. "इद्रिस नायकवडी या ‘महान विभुती’ची राज्यपालांनी विधान परिषदेवर नियुक्ती केली. अशा नियुक्त्यांच्या वेळी त्यांचा पूर्वइतिहास तपासून निर्णय घ्यावे लागतात. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत ‘नगरपिता’ असताना या महान माणसाने ‘वंदे मातरम्’ला विरोध केला होता. ‘वंदे मातरम्’ सुरू असताना हे महाशय सभागृहात बसून राहिले होते. याच दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे ते सूत्रधार होते," अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.

‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानाला इद्रिस नायकवडी यांनी विरोध केला व त्याबद्दल...

"इद्रिस मियांच्या कृतीविरुद्ध त्यावेळी भाजपचे मकरंद देशपांडे, शिवसेनेचे विकास सूर्यवंशी व तथाकथित हिंदुत्ववादी मनोहर भिडे यांनी आंदोलन केले होते. बाबरी प्रकरणानंतर मिरजेत उसळलेल्या दंगलीस रसद पुरवण्याचे काम इद्रिस महाशय करीत होते. इतकी सर्व ‘पदके’ असलेल्या व्यक्तीस भाजपच्या मिंधे टोळीने थेट राज्यपाल नियुक्त आमदार केले. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानाला इद्रिस नायकवडी यांनी विरोध केला व त्याबद्दल पंचवीस वर्षांनी फडणवीस, मिंधे यांनी संयुक्तरीत्या नायकवडी यांना आमदारकीची बक्षिसी दिली," असा खोचक टोका 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

देशवासीयांच्या भावनाच पायदळी तुडवल्या

"राष्ट्रगानास विरोध करणे हा राष्ट्रीय अपराध आहे व त्याबाबत भाजपचे हिंदुत्ववादी कमालीचे सावध असतात. काल-परवाकडे जम्मू-कश्मीरमधील ओमर अब्दुल्ला मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा पार पडला. हा सोहळा झोकात झाला. मात्र या सोहळ्यात राष्ट्रगान सुरू असताना नॅशनल कॉन्फरन्सचे एक आमदार अकबर लोन हे उभे राहिले नाहीत व त्याबाबत श्रीनगर पोलिसांनी कलम 173 (3) नुसार त्यांची चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रगीताचा अपराध हा दंडनीय अपराध आहे व त्या अपराधावर कोणीच तडजोड करणार नाही. यावर या आमदार महोदयांचे असे म्हणणे आहे की, ‘मी राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण पाठदुखीने बेजार असल्याने मला फार वेळ उभे राहता आले नाही.’ अकबर यांनी हा खुलासा केला असला तरी जम्मू-कश्मीर पोलिसांनी राष्ट्रगीताच्या अपमानाची दखल घेऊन चौकशी सुरू केली. महाराष्ट्रात मात्र राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करून मिंधे-फडणवीस सरकारने देशवासीयांच्या भावनाच पायदळी तुडवल्या," असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

हेच तर त्यांचे ढोंग

"इद्रिस नायकवडी यांच्या विरोधातले आंदोलन हे भाजप व मनोहर भिडे यांच्या पुढाकाराने झाले होते. नायकवडी यांनी तेव्हा जे केले ते आता उकरून निघाले. नायकवडी आता आव आणतात की, ‘साहेब, काहीतरी गैरसमज होतोय. तो मी नव्हेच!’ भाजपात घुसलेले सर्व भ्रष्टाचारी ‘तो मी नव्हेच’ हाच आव आणत आहेत. इद्रिस नायकवडी प्रकरणात भाजपच्या गोटातील टिल्ले-पिल्ले आणि स्वतःला ‘हिंदूंचा गब्बर’ वगैरे म्हणवून घेणारे तोंडात दुधाची लोटी चघळत गप्प बसले आहेत. ‘वंदे मातरम्’चा अपमान करणाऱ्या इद्रिस नायकवडी यांना आमदारकी देण्यावरून त्यांना सांगली, मिरजेत जाऊन राष्ट्रभक्तांची किंवा हिंदूंची एखादी सभा घ्यावी असे वाटले नाही. हेच तर त्यांचे ढोंग आहे," असा टोला कोणाचेही थेट नाव न घेता लगावला आहे.

महाराष्ट्रात ‘वंदे मातरम्’चा सौदा

"राज्यपालांनी सात जणांना नामनिर्देशित केले. त्यातले एक रत्न इद्रिस नायकवडी. उरलेल्या पाचेक जणांचा इतिहासही बरा नाही. भ्रष्टाचाऱ्यांना मदत करणारे व भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी पक्षांतर करणाऱ्यांनाही राज्यपालांनी आमदार केले. पक्ष फोडणारे व खोक्याने विकत घेतलेले लोक अशा बेकायदेशीर पद्धतीने घटनात्मक पदावर बसवून एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी न्यायदेवतेचे अब्रुहरणच केले. राज्यातले सरकार बेकायदेशीर आहे व त्या सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर राज्यपाल पांघरुण घालत आहेत. संविधान घरोघरी पोहोचविण्याचा उपक्रम राबवण्यापेक्षा या लोकांनी आधी स्वतःच संविधान वाचून काढले पाहिजे. आता न्यायदेवतेच्या हाती तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक दिले आहे, पण तुमच्या मानेवरील मडक्यात फक्त कचराच भरला आहे. भाजपातील केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा निष्ठावंतांना फक्त सतरंज्याच उचलायची जबाबदारी देऊन उपऱ्यांना व ‘वंदे मातरम्’विरोधकांना आमदारक्या बहाल केल्या जात आहेत. भाजपात निष्ठा आणि विचारांचे मोल उरलेले नाही. भाजप उपऱ्यांच्या हाती, मिंधे गट भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती व अजित पवारांची टोळी बाजारबुणग्यांच्या हाती गेल्याने विधिमंडळात भलतेसलते लोक पाठवले जात आहेत. लोकांनी ‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी लढे द्यायचे आणि ‘वंदे मातरम्’विरोधकांना पदे देऊन एकनाथ शिंदेंनी सौदे करायचे. महाराष्ट्रात ‘वंदे मातरम्’चा सौदा झालाच आहे," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.