नाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

शैलेश मुसळे | Updated: Apr 23, 2018, 10:46 AM IST
नाणार प्रकल्पावरुन शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार? title=

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या नाणार दौ-यावर येत असून, जाहीर सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करून, शिवसेनेनं आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी अशी अपेक्षा नाणारवासियांची आहे.

मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेऊन, सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रीपद सोडू अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणाऱ्या सुभाष देसाई यांच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष असेल.

'स्थानिकांमध्ये फूट'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नाणारमध्ये सोमवारी होणारच असल्याचं स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी दिलाय. तसंच सभेवर ग्रामस्थांचा बहिष्कार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. नाणार रिफायनरी विरोधातील एकजूट फोडण्याचा प्रयत्न काही संधीसाधू लोक करतायत असा आरोप राऊत यांनी केलाय. तसंच स्थानिकांना भडकावण्याचा काम होतंय असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातमीचा व्हिडिओ