दारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक

 पोलिसांनी यावेळी किरीटच्या कारमधून दारूने भरलेल्या १४ ट्यूबचा साठा जप्त केला असून मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील 'चारोटी' नाक्यावरून हा साठा घेऊन घोडबंदर रोडवरून किरीट मुंबईच्या जुहूकडे निघाला होता.

Updated: Apr 22, 2018, 10:57 PM IST
दारू माफिया किरीट सौमय्याला  'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून  अटक title=

ठाणे : ट्रकच्या टायर ट्यूबमधून गावठी दारूची तस्करी करणाऱ्या दारूमाफिया किरीट सौमय्या याला ठाणे वाहतूक पोलिसांनी 'फिल्मी स्टाईल' पद्धतीने पाठलाग करून घोडबंदर रोड येथे आज अटक केली.  पोलिसांनी यावेळी किरीटच्या कारमधून दारूने भरलेल्या १४ ट्यूबचा साठा जप्त केला असून मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील 'चारोटी' नाक्यावरून हा साठा घेऊन घोडबंदर रोडवरून किरीट मुंबईच्या जुहूकडे निघाला होता.

पोलिसांनी रोखूनही सोमय्या सुसाट

जोगेश्वरीच्या गुंफा रोड येथील भावेनगर भागात राहणारा किरीट रामजीभाई सौमय्या (६६) हा स्वतःच्या कारच्या डिक्कीमधून टायर ट्यूबमध्ये गावठी दारूची नेहमीच वाहतूक करतो. रविवारी पोलिस नाईक  निलेश गजरे व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी जाधव नागला बंदर येथे नाकाबंदीसाठी होते. यावेळी किरीटच्या गाडीच्या काळ्या काचा पाहून गजरे यांनी त्याला रोखले. मात्र न थांबता सुसाट वेगात निघालेल्या किरीटचा वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचा बाईकवरून पाठलाग करण्यास सुरवात केली.

सोमय्या पुढे पोलीस मागे

दरम्यान, सोमय्या पुढे आणि पोलीस मागे असा पाटलाग काही काळ रंगला.  अखेर घोडबंदर रोड येथील विजय गार्डनच्या सिग्नलला वाहतूक कोंडी असल्याने कॉन्स्टेबल कदम यांनी बाईकवरून उतरून त्याला रोखण्यासाठी धडपड केली. मात्र त्याने कदम यांना धडक देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता गजरे यांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेत त्याला गाडीबाहेर काढले. यावेळी त्याच्या गाडीत १४ ट्यूबमध्ये भरलेली गावठी दारूचा साठा आढळला.