उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Updated: Nov 13, 2017, 01:47 PM IST
उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच! title=
संग्रहित छाया

मुंबई : मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही तरी या मार्गाने या आणि कोकणवासीयांच्या व्यथा जाणून घ्या, अशा मागणीचे पत्र स्वतंत्र कोकण राज्य मागणी कृती समितीचे अध्यक्ष आदेश सुरेश खाडे यांनी लिहिलेय.

उद्धव ठाकरे १५ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. ते रत्नागिरी शहरातील माळनाका येथील स्कायवॉकचे उदघाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने हे पत्र आदेश खाडे यांनी लिहिलेय. या पत्रात म्हटलेय, आमच्या कोकणवासीयांच्या व्यथा जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आपण रत्नागिरीच्या दौऱ्यावर येताना मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गानेच यावं आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची कशी चाळण बनवली आहे, याचा प्रत्यक्षात अनुभव घ्यावा.

कोकणामधून देशाला दरवर्षी ६० टक्के महसूल मिळत आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाला आहे. रत्नागिरी जिल्हयातही पर्यटकांचा ओघ वाढत आहे. अशा परिस्थितीत कोकणची जीवन वाहिनी असलेला मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली असेल तर पर्यटक कोकणात कसे येणार, असा सवाल उपस्थित केलाय.

 कोकणी माणसाच्या मनात एक प्रश्न येतो रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील आमदार पालकमंत्री हे कोणत्या मार्गाने त्यांच्या जिल्हयात जातात? सामान्य कोकणी माणूस या महामार्गाच्या खड्डयामुळे त्रस्त झालेला आहे. या महामार्गाबद्धल बोंबाबोंब करत आहे. या जिल्हयाचे लोक प्रतिनिधी गप्प बसून का आहेत? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला न्याय कधी मिळणार ? अशी कोकणी माणसाच्या व्यथा आहे, ती जाणून घेण्यासाठी तरी तुम्ही रस्त्याने प्रवास करा, अशी खाडे यांनी मागणी केलेय.