Union Budget 2024: 'PM मोदींसमोर तुम्ही....', उद्धव ठाकरेंनी केलं निर्मला सीतामरण यांच्या धाडसाचं कौतुक

Uddhav Thackeray on Union Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget) टीका केली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamn) यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली.   

शिवराज यादव | Updated: Feb 1, 2024, 01:25 PM IST
Union Budget 2024: 'PM मोदींसमोर तुम्ही....', उद्धव ठाकरेंनी केलं निर्मला सीतामरण यांच्या धाडसाचं कौतुक title=

Uddhav Thackeray on Union Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget) टीका केली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamn) यांचं उपाहासात्मकपणे कौतुक केलं आहे. पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली. तसंच मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता असा विश्वासही व्यक्त केला. रायगडमध्ये ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "निर्मला सीतारमण यांनी गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 जाती देशात असून त्यांच्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मोठं धाडस केलं आहे. अर्थसंकल्प मांडताना पंतप्रधानांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. निवडणुका आल्यानंतर तरी त्यांनी तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं आहे. त्यांच्या पलीकडेही जो देश आहे त्यात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं. 10 व्या वर्षी तुम्हाला हे कळलं की, अदानी वैगेरे म्हणजे देश नाही. सुटाबूटातलं सरकार आता गरिबांकडे लक्ष द्यायला लागलं आहे". 

"जर महिलांकडे इतकं लक्ष देत असाल तर मणिपूरमध्ये जा. आम्हाला मतं हवी आहेत म्हणून महिलांसाठी काम करणार हे जाऊन सांगा. बिल्किस बानोचीही भेट घ्या, तिलाही सांगा. उत्तरेतील शेतक-यांनी आंदोलन केलं तेव्हा त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं. आता त्यांचं काम करणार आहात. हे सगळं थोतांड, भुलभलय्या आहे. दिल्लीत जादुचे प्रयोग सुरू आहेत," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

"अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. अशा फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही. नंतर सिलेंडरच्या किंमती दुपटीने वाढतील. तरुणांना रोजगार कुठे मिळत आहे?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. 

"गाडायचे असेल खड्डा खणावा लागेल. मतांची माती टाकून त्यांना गाडायचं आहे. पण जर खड्डा खणायचा असेल तर घराघऱात जावं लागेल. सरकारच्या कामाचा आढावा घ्या. अर्थसंकल्प प्रत्यक्षात उतरले  का ते पाहा. जाहीरनाम्यातून किती थापा मारल्या ते बघा," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. 

"वादळाचे संकट येवूनही पंतप्रधान फिरकले नाहीत. केंद्राने काहीच मदत केली नाही. पण आता महाराष्ट्राच्या वाऱ्या करतायत. सातारा, शिवनेरी, पोहरादेवी, पेनलाही जातील. एकदा मतं दिल्यावर तुम्हाला चिरडणे म्हणजे हाच यांचा विकास आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

"राम काय तुमची खाजगी पॉपर्टी नाही. राम केवळ मोदींचा नाही. हा राम करोडो रामभक्तांचाही आहे. पण तिथे एका निर्बुद्ध व्यक्तीने मोदींची तुलना आमचं दैवत शिवरायांशी केली. एकतरी साम्य दाखवून द्या," असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

"जादूगार येवून तुम्हाला टोप्या घालतील. तेव्हा रायगड मोदीलाटेत वाहून गेला नव्हता. रायगडमध्ये जास्त प्रचार करण्याची गरज नाही. मागील वेळी मोदीलाटेच्या विरोधात मतदान केले होते. आताही तसंच होणार," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. "400 पार होण्याची तयारी असताना नितीश कुमार कशाला हवे आहेत. मोदी गॅरंटी असल्याचं सांगत आहेत. मी एका वृत्तपत्रात दोन बातम्या वाचल्या. हेमंत सोरेन यांना अटक व दुसरीकडे अजित पवारांना क्लिनचिट. हीच मोदी गॅरंटी आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.