'डरकाळी' फोडणाऱ्या वाघाचे कान किटतात तेव्हा...

ज्या महाबळेश्वराच्याच साक्षीनं आपण पक्षप्रमुख झालो, त्या महाबळेश्वरात हवापालटासाठी जावं... चार दिवस राहावं.... असं उद्धव ठाकरेंना वाटलं.... महाबळेश्वरात चार क्षण विसावताच एका डीजेमुळे ठाकरेंचे कान किटले..... तो डीजे नेमका होता भाजपवाल्यांचा.... मग पुढं बरंच काही घडलं आणि बिघडलं.... पाहुया ऐन थंडीत महाबळेश्वरमधलं एक गरमागरम राजकीय नाट्य...

Updated: Dec 26, 2017, 08:10 PM IST
'डरकाळी' फोडणाऱ्या वाघाचे कान किटतात तेव्हा...  title=

मुंबई / महाबळेश्वर : ज्या महाबळेश्वराच्याच साक्षीनं आपण पक्षप्रमुख झालो, त्या महाबळेश्वरात हवापालटासाठी जावं... चार दिवस राहावं.... असं उद्धव ठाकरेंना वाटलं.... महाबळेश्वरात चार क्षण विसावताच एका डीजेमुळे ठाकरेंचे कान किटले..... तो डीजे नेमका होता भाजपवाल्यांचा.... मग पुढं बरंच काही घडलं आणि बिघडलं.... पाहुया ऐन थंडीत महाबळेश्वरमधलं एक गरमागरम राजकीय नाट्य...

अविनाश भोसलेंचा बंगला सज्ज

एरवी 'डेसिबलची भाषा आम्हाला समजत नाही', असं म्हणणाऱ्या ठाकरेंना 'व्हॉ़ल्युम कम' कर असं म्हणण्याची वेळ आली... त्याचं झालं असं की हवापालटासाठी म्हणून ठाकरे कुटुंब महाबळेश्वरला गेलं... नेहमीप्रमाणे उद्योजक आणि ठाकरेंचे मित्र अविनाश भोसले यांचा बंगला आदरातिथ्यासाठी सज्ज होताच... 

उद्धव ठाकरे चार निवांत क्षण अनुभवतायत, तोच शेजारच्या हॉटेल 'एव्हरशाईन कीज'मध्ये लग्नाच्या वरातीत डीजे सुरू झाला...  एरवी डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाला हा आवाज काही सहन झाला नाही... आणि आवाज बंद करण्याचं फर्मान निघालं... पण ही वऱ्हाडी मंडळी निघाली नेमकी मुख्यमंत्र्यांच्या जवळची... विदर्भातल्या एका भाजप आमदाराच्या पुतण्याचाच विवाह सोहळा सुरू होता. 'आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय' म्हणत वऱ्हाडी मंडळींना चेव चढला होता.

अधिकाऱ्यांना 'आदेश' आणि कारवाई

मग, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुंबईतल्या कार्यालयातून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आदेश गेले. मग पोलीस खात्यालाही आदेश गेले... पण रात्रीचे दहा वाजायच्या आत कारवाई कशी करणार? असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयातून विचारला गेला.... शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना महाबळेश्वरातही रंगला.... दोन खात्यांच्या भांडणात पोलीस आणि साता-याच्या प्रशासनाची पुरतची गोची झाली... त्यात दबाव प्रचंड वाढल्यानंतर अखेर वऱ्हाडी मंडळींवर ध्वनी प्रदूषणाची कारवाई करण्यात आली.

हॉटेल झालं बंद...

काही दिवसांनी ठाकरे कुटुंबीय मुंबईत परतल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून सूत्रं हलली. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलवरच थेट कारवाई केली. जवळपास ८४ अलिशान  खोल्या असलेल्या सर्वात मोठ्या हॉटेलला सील ठोकलं गेलं.  हॉटेलचं नळ कनेक्शन तोडलं. विद्युत पुरवठा तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. महाबळेश्वर नगरपालिकेला अचानक या हॉटेलमधलं बांधकाम बेकायदेशीर असल्याचा साक्षात्कार झाला.... आठवडाभरात तीन नोटीसा पाठवण्यात गेल्या.... अगदी मलिष्कानं खड्ड्याचं गाणं म्हंटल्यावर तिच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या तसंच या हॉटेलच्या उण्या बाजू प्रशासनाला इतक्या वर्षांनी ठळकपणे दिसू लागल्या.

...पण, ठाकरेंचा संबंध नाही!

उद्धवना त्रास झाल्यावरच हे सगळं झालं तरी पर्यावरण मंत्री म्हणतात उद्धव ठाकरेंचा आणि हॉटेलवरच्या कारवाईचा काहीही संबंध नाही. या सगळ्या सावळ्या कारभारामुळे ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या देशी, विदेशी पर्यटकांना हॉटेल सोडून जावं लागलं.

ऐन इअर एन्डच्या काळात हॉटेलला कुलूप ठोकावं लागलं..... एकीकडे अभी तो पार्टी शुरू हुई है, म्हणत युवासेना प्रमुख रात्रभर मुंबईतलं पार्टी कल्चर सुरू ठेवण्यासाठी फिल्डिंग लावतायत... पण दुसरीकडे डीजेच्या आवाजानं याच ठाकरेंचे कान किटले म्हणून पार्टीच काय हॉटेलही बंद होतं... ये बात कुछ जमी नही.... एक पाय सत्तेत आणि एक पाय बाहेर असलेल्या एका पक्षाच्या प्रमुखांच्या कानाला त्रास झाला म्हणून एवढी तत्परता दाखवणारं सरकार सामान्यांच्या तक्रारीबाबतही एवढंच तत्पर राहील काय?