उद्धव ठाकरेंच्या निर्विघ्न दौऱ्यासाठी देवासमोर गाऱ्हाणी आणि आरत्या

अयोध्येत उद्धव ठाकरेंच्या स्वागताची तयारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय

Updated: Nov 24, 2018, 01:15 PM IST
उद्धव ठाकरेंच्या निर्विघ्न दौऱ्यासाठी देवासमोर गाऱ्हाणी आणि आरत्या  title=

रत्नागिरी / पुणे : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत कोकणातल्या शिवसैनिकांमध्येही उत्साह आहे. कोकणात कुठल्याही चांगल्या कामासाठी ग्रामदैवतेला साकडे घालण्याची परंपरा आहे... त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निर्विघ्नन पार पडावा, यासाठी रत्नागिरीच्या ग्रामदैवतेला शनिवारी शिवसैनिकांनी गाऱ्हाणं घालण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी रत्नागिरीचं ग्रामदैवत भैरी देवाला पारंपारिक पद्धतीने शिवसैनिकांनी साकडं घातलं. 

दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही विविध मंदिरांमध्ये आरती केली जात आहे. पुण्यातील तुळशी बाग इथल्या राम मंदिरमध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी आरती केली. यावेळी शिवसैनिकांनी श्रीराम अशी अक्षर असलेले पेढेही वाटले. केंद्रानं अध्यादेश काढावा तो काढताना सर्वोच्च न्यायालयाचं मार्गदर्शन घ्यावं आणि जी मंदिरं आक्रमण होऊन उद्वस्थ झाली आहेत ती पुन्हा हिंदू धर्मियांना मिळावीत अशी मागणी यावेळी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी केलीय. राममंदिर उभं राहण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जी काही जबाबदारी मिळेल ती घ्यायची उध्दव ठाकरेंची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी पुण्यात आरती
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी पुण्यात आरती

उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जोरदार तयारी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला अयोध्येत पोहोचतील.... त्यांच्या आगमनासाठी फैजाबादमधल्या एअरपोर्टवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. दरम्यान, उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि विश्व हिंदू परिषदेची सभा यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जोरदार तयारी इथं दिसतेय. या स्वागताची तयारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय.