ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी?

या गुफ्तगूसाठी निमित्त ठरलंय ते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाचं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 01:34 PM IST
ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी? title=

सातारा : दिल्लीसह देशभरात आता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची जय्यत तयारी सुरू झालीय. राजकीय गाठीभेटी दौरे यामधून निवडणूकीची चाहूल लागलायला सुरूवात झालीय. शरद पवारांच्या कराड दौऱ्यातही निवडणुकीआधीचं गुफ्तगू झाल्याचं पुढे येतंय, आणि या गुफ्तगूसाठी निमित्त ठरलंय ते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाचं.

१९९९ सालापासून राष्ट्रवादीचा बाले किल्ला

सातारा जिल्हा हा १९९९ सालापासुन राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणुन परिचित आहे. सुरुवातीला सातारा आणि कराड हे दोन लोकसभा मतदार संघ होते,१९९९ ते २००९ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत साताऱ्यातून लक्ष्मणराव पाटील आणि कराड लोकसभा मतदार संघातून श्रीनिवास पाटील हे मोठया मताधिक्क्याने निवडुन आले. त्यानंतर कराड लोकसभा मतदार संघ रद्द होउन फक्त सातारा मतदार संघ राहिला.

खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारची खासदारकी

गेल्या दोन निवडणूकीत पंचवार्षिक खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारची खासदारकी मिळताना मोठा विजय संपादित केला. पण अजित पवार आणि उदयनराजे भोसलेंचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता नव्या उमेदवाराची पवारांनी चाचपणी सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली. 

श्रीनिवास पाटील हे सध्या सिक्कीमचे राज्यपाल

माजी खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत. त्यांचा कार्यकाल दोन महिन्यात संपणार आहे. माजी खासदार श्रीनिवास पाटिल यांचा वाढदिवस असल्याने शरद पवार यानी कराड येथे निवासस्थानी जाउन शुभेच्छा दिल्या. 

सुमारे अर्धा तास बंद केली चर्चा

सुमारे अर्धा तास बंद केली चर्चा केली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. श्रीनिवास पाटील आणि शरद पवार हे जिवलग मित्र म्हणून सर्वाना परिचित आहेत गेल्या १० वर्षात सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झालंय. त्यामुळे श्रीनिवास पाटलांना खासदारकीचं तिकीट मिळावं यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.

श्रीनिवास पाटील हे संयमी आणि अनुभवी नेतृत्व

साताराचे खासदार उदयनराजे म्हणजे राष्ट्रवादीसाठी असुन अडचण नसुन खोळंबा अशी झालीय. मात्र उदयनराजे यांना कडवी झुंज देणारे श्रीनिवास पाटील हे संयमी आणि अनुभवी नेतृत्व असल्याने राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली आहे. येत्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घेणार असल्याने तरी शरद पवार यांच्या मनात नक्की काय चाललय याचा प्रत्यय लवकरच येणार आहे.