योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : जन्म आणि मृत्यू कुणाच्याच हातात नसतो. नाशिकमध्ये मात्र एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे सगळेच जण हळहळ व्यक्त करत आहेत (Nashik Crime). दोघा भावांचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे. घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे (drowned in river).
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात ही घटना घडली आहे. हे दोघे भाऊ पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता रेल्वे स्टेशन व देवळे पूल दरम्यान हे दोघे दारणा नदीपात्रात गेले होते. मासेमारी करण्यासाठी हे दोघे गेले असताना ते दारणा पात्रात बुडाले. देवळे शिवारातील नदी पात्रात हा प्रकार घडला. हे दोघे भाऊ इगतपुरीजवळील फणसवाडी या गावातील रहिवासी असल्याचे समजते.
इगतपुरी तालुक्यातील फणसवाडी येथील चार ते पाच मच्छीमार युवक रविवारी मासेमारी करण्यासाठी गेले होते. गळं टाकून मासेमारी करत असताना त्यातील एकाचा गळ पाण्यात अडकल्याने गळ काढण्याच्या प्रयत्नात बालाजी काशिनाथ पिंगळे (२७) याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे दृश्य पाहात त्याचा भाऊ पंकज काशिनाथ पिंगळे (३७) याने भावाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, दारणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले असल्याने हे दोघेही भाऊ पाण्यात बुडाले.
मासेमारी करणारे हे दोघे भाऊ दारणा नदीपात्रात बुडाल्याचे समजताच त्यांच्या सोबत असलेल्या अन्य युवकांनी आरडाओरड केला. यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि युवकांनी नदी पात्राकडे धाव घेतली. बुडालेल्या भावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत यंत्रणेला माहिती दिली. घटनास्थळी रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. दरम्यान, शोधकार्यासाठी कसारा येथील जीवरक्षक पथकाला बोलावण्यात आले. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवार सकाळी शोधकार्य सुरु करण्यात आले.