'ट्विन टनेल' फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईत 'ट्विन टनेल'  उभारणार. मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी नीति आयोग मांडणार विकासाची ब्ल्यू प्रिंट.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली. 

वनिता कांबळे | Updated: Aug 29, 2023, 09:47 PM IST
 'ट्विन टनेल' फोडणार मुंबईतील वाहतूक कोंडी; मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट  title=

Eknath Shinde : मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच 'ट्विन टनेल' उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नीति आयोगाच्या मदतीनं मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं येत्या डिसेंबरमध्ये मुंबई विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता 

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीनं मुंबईचा विकास करण्यासाठी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली.  त्याशिवाय मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे उभारणार

गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्याने अनेक विकास कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळालेय. 2024 पर्यंत त्यातले अनेक प्रकल्प पूर्ण होतील. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंक तसेच कोस्टल रोड अशी उदाहरणे दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे लवकरच उभी राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित करणार

केंद्राच्या समन्वयाने मुंबई आणि परिसराचा आर्थिक विकास करण्यासाठी प्राधान्याने पाऊले टाकली जातील. पोर्ट ट्रस्टकडे केंद्राच्या मालकीची भरपूर जागा आहे. तिचा सुयोग्य वापर करून मुंबईच्या आर्थिक विकास प्रक्रियेत मोठा उपयोग करून घेता येऊ शकतो. केंद्राशी याबाबतीत समन्वय ठेऊन पाठपुरावा केला जाईल. मरीन ड्राईव्हप्रमाणे पूर्व सागरी किनाराही विकसित आणि सुंदर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

ठाणे - भिवंडी - कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा 

मुंबई मेट्रो मार्गिका 4, 4 ए, आणि 11 साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला. मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे - भिवंडी - कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करणार

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.  पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.