चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ : जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना भारतात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच अंबरनाथमधून आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस दलातल्या २ जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांचा कोरोनामुळे दु:खद निधन झाले आहे. दोन्ही भाऊ पोलीस दलात सेवा बजावत होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते.
हे दोघेही जुळे भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते आणि त्यांनी एकत्रच ट्रेनिंग देखील पूर्ण केलं होतं. दिलीप घोडके यांचा २० जुलै रोजी तर जयसिंग घोडके यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.