आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे अन् 207 किलो सोने, किंमत तब्बल...

Tulja Bhavani Temple: बुधवारपासून सुरू आहे आई तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजणी. आई तुळजाभवानीच्या चरणी 354 मौल्यवान हिरे दान

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 11, 2023, 11:56 AM IST
 आई तुळजाभवानीच्या चरणी 354  मौल्यवान हिरे अन् 207 किलो सोने, किंमत तब्बल...  title=
tulja bhavani temple gold and diamonds worth rupees 20 lakh

धाराशिवः महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani Temple) तिजोरीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची गेल्या दोन दिवसांपासून मोजदाद सुरू आहे. अजून २५ दिवस ही मोजदाद सुरू राहणार आहे. यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी भक्तांनी ३५४ मौल्यवान हिरे अर्पण केले आहेत. तर, आत्तापर्यंतच्या मोजदादीत २०७ किलो सोन्याचे दान दिल्याचे समोर आले आहे.

मौल्यवान हिरे

गेल्या बुधवारपासून आई तुळजाभवानीच्या चरणी अर्पण केलेल्या सोने, चांदी, हिरे अशा मौल्यवान वस्तूंची मोजदाद सुरू आहे. या मोजदादीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आई तुळजाभवानीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूची मोजणी झालेली नव्हती. गेल्या बुधवारपासून या मोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात देशभरातील भक्तांनी आई तुळजाभवानीच्या चरणी किती दान केला आहे हे उघड होणार आहे.

इन-कॅमेरा होणार मोजदाद

जिल्हाधिकारी संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आई तुळजाभवानीच्या दागिन्यांची मोजदाद सुरू आहे. कडेकोट सुरक्षेत तसेच कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ही मोजदाद सुरू आहे. आत्तापर्यंत तिजोरीत ३४५ हिरे आढळून आले आहेत. या हिऱ्यांची किंमत अंदाजे २० लाख रुपये इतकी आहे. देवीला इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. आत्तापर्यंतच्या मोजदादीत २०७ किलो सोने आले आहे. या सोन्याची किंमत ६५ कोटी रुपये आहे. 

सोनाराची नियुक्ती 

सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळेत आई तुळजाभवानीच्या मंदिरातील दागिन्यांची मोजदाद सुरू आहे. तसंच, दान म्हणून आलेले सोने, चांदी, हिरे हे खोटे आहेत की खरे याची तपासणी करण्यासाठी एका सोनाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 

मोजदाद करणाऱ्यांसाठी खास ड्रेस

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दागिन्यांची मोजदाद झाल्यानंतर दान आलेले सोने वितळवण्यासाठी आरबीआय मदत करणार आहे. तसंच, दागिन्याच्या मोजदाद प्रक्रियेत सहबागी होणाऱ्या मंडळींना खास वेश देण्यात आला आहे. मोजदाद करणाऱ्यांना परिधान करण्यासाठी जे कपडे देण्यात आले आहेत. त्यांना शर्ट आणि पँटला एकही खिसा देण्यात आलेला नाही. 

हायटेक यंत्रणा उभारणार 

तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे. शिर्डी आणि तिरुपती बालाजी देवस्थानाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात हायटेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मंदिरातील वाढती गर्दी पाहता भाविकांना सर्व सोयी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.