अनेक दिवसानंतर तृप्ती देसाई पुन्हा चर्चेत...

शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा

Updated: Dec 8, 2020, 08:55 PM IST
अनेक दिवसानंतर तृप्ती देसाई पुन्हा चर्चेत... title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : शिर्डीमध्ये लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडचा वाद आणखी चिघळला आहे. शिर्डी संस्थाननं लावलेले बोर्ड हटवण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना शिर्डीत प्रवेशबंदी केलीय.श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात नवाच वाद पेटला आहे.

भाविकांनी भारतीय पोषाखात साईंच्या दर्शनाला यावं, अशी सक्ती शिर्डी साई संस्थाननं केली आहे. शिर्डी साई संस्थानच्या या आवाहनानुसार, शिर्डीत ठिकठिकाणी तसे फलक लावले जातायत. त्यात राजकीय पक्षांनीही सक्रीय पुढाकार घेतलाय. एवढंच नव्हे तर भारतीय पोषाखाबाबत भाविकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्नही शिर्डी साई संस्थान करताना दिसत आहे.

या वादात तृप्ती देसाईंनी उडी घेतलीय. ड्रेस कोडबाबत लावलेले फलक हटवण्याची मागणी त्यांनी केलीय. एवढंच नव्हे तर १० डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक हटवण्याचा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय. त्यामुळं शिर्डी ग्रामस्थ चांगलेच संतापलेत. तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मनसेनं दिलाय.

फलक हटवण्याचा प्रयत्न झाल्यास तोडीस तोड उत्तर देऊ, असा इशारा ब्राह्मण महासंघानंही दिला आहे.

याआधी शनी शिंगणापूर मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी तृप्ती देसाईंनी पुढाकार घेतला होता. आता शिर्डी संस्थान आणि ग्रामस्थांच्या विरोधात त्यांनी पाऊल टाकलंय. हा संघर्ष आता काय वळण घेतो, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.