कोरोनाच्या धास्तीने कोकणातील पर्यटकांच्या संख्येत घट

कोरोना व्हायरसचा पर्यटनावर परिणाम, पर्यटकांअभावी किनाऱ्यांवर शुकशुकाट

Updated: Mar 15, 2020, 03:08 PM IST
कोरोनाच्या धास्तीने कोकणातील पर्यटकांच्या संख्येत घट title=

रत्नागिरी : कोरोना व्हायरसमुळे सध्या पर्यटनावर देखील परिणाम झाल्याचं दिसून येतं आहे. कोकणात सध्या ६० ते ७० टक्क्यांनी पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक देखील चिंतेत आहेत. शिवाय, गणपतीपुळे सारख्या ठिकाणी देखील भाविकांची संख्या कमी झाली आहे. 

कोकणात अद्याप देखील काही पर्यटक हे परदेशातून आणि देशाच्या, राज्याच्या कोपऱ्यातून येत आहेत. त्यांनी यावेळी काळजी घ्यावी, कोरोना होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, एप्रिल आणि मे मधील बुकींक देखील सध्या पर्यटक रद्द करत असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सुट्टीच्या दिवशी जे किनारे पर्यटकांनी फुललेले असतात त्या किनाऱ्यांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. 

राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, कोरोना व्हायरसमुळे औद्योगिक क्षेत्रावरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. पर्यटनासोबतच, धार्मिक स्थळ, पोल्ट्री व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसतो आहे. चीनवरून येणाऱ्या मालाचा तुटवडा पडू लागल्याने काम थांबवलं जात आहे. परदेशातून येणारा कच्चा माल कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाल्याने अनेक कंपन्यांना मोठ्या नुसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम कामगार वर्गासह अर्थव्यस्थेवरही होणार आहे.