महाराष्ट्रात पावसाचे आगमन होताच भाज्यांचे दर गगनाला भिडले. यंदा कांदा नाही तर टोमॅटोच्या भावाने कंबरडे मोडले आहे. आता 1 किलो टोमॅटोसाठी किती रुपये मोजावे लागणार. जाणून घ्या सविस्तर
राज्यात पावसाचे आगमन होताच भाज्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. प्रत्येक वेळी कांदा मोठ्या प्रमाणात महाग होतो. मात्र, सध्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. 30 ते 40 रुपये विकला जाणारा टोमॅटो पावसामुळे 100 रुपये किलो विकला जात आहे. यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अचानक का वाढले टोमॅटोचे दर?
महाराष्ट्रातील अनेक भागात पाणी टंचाई आणि कडक उन्हामुळे शेतकरी संकटात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुराचे संकट आले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या अन्य भाज्या आणि टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे टोमॅटोसह अन्य भाज्या देखील महाग झाल्या असून टोमॅटोने ग्राहकांना गेल्या वर्षीची आठवण करुन दिली आहे.
यंदाही टोमॅटो खिसा रिकामा करणार?
गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही टोमॅटो सर्व सामान्य नागरिकांचा खिसा रिकामा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी टोमॅटोचे दर हे 200 पर्यंत गेले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांमध्ये टोमॅटोचे दर कमी झाले. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती निर्माण झाली असून टोमॅटोने गेल्या वर्षीची आठवण करून दिली आहे.
टोमॅटोला कोणत्या बाजारात किती दर?
मुंबईमध्ये 100 ते 120 रुपये प्रति किलो टोमॅटो, दिल्लीमध्ये 90 रुपये प्रति किलो टोमॅटोचे दर, मेरठमध्ये 80 रुपये किलो टोमॅटो, गाझीपूरमध्ये 80 रुपये किलो, चंदीडगमध्ये 50 रुपये तर मुरादाबादमध्ये टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो.