2 लाख गुंतवा, 7 दिवसांत 44 लाख कमवा, दामदुपटीच्या नादात 500 कोटींना चुना

एका रात्रीत श्रीमंत बनायचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांना पडतं. पण श्रीमंत बनण्याच्या नादात तुम्ही कसे कंगाल होऊ शकता. 

Updated: Oct 12, 2022, 11:41 PM IST
2 लाख गुंतवा, 7 दिवसांत 44 लाख कमवा, दामदुपटीच्या नादात 500 कोटींना चुना  title=

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : आता बातमी तुमचे डोळे उघडणारी. एका रात्रीत श्रीमंत बनायचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांना पडतं. पण श्रीमंत बनण्याच्या नादात तुम्ही कसे कंगाल होऊ शकता? पाहूयात त्याबाबतचा हा धक्कादायक रिपोर्ट. सोलापूरकरांसाठी सोमवार हा ब्लॅक मंडे ठरला. कारण दामदुप्पट डॉलर योजनेला बळी पडलेल्या हजारो सोलापूरकरांची तब्बल 500 कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. पोलीस, वकील, डॉक्टर, कारखानदार, सराफ, शिक्षक अशा पेशातल्या हजारो नागरिकांनी व्हर्च्युअल मनीमध्ये कोट्यवधी रुपये गुंतवले होते. (thousands of solapur citizens were cheated to the tune of rs 500 crore in the double dollar scheme)

लखपती होण्याच्या नादात कंगाल

CCH नावाच्या अमेरिकन कंपनीनं ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून दामदुप्पट योजनेचं आमीष दाखवलं. 2 लाख 30 हजार रुपये गुंतवा आणि 7 दिवसांत 44 लाख रुपये मिळवा, अशी ही ऑफर होती. अनेकांनी अगदी कर्ज काढून या CCH अॅपमध्ये गुंतवणूक केली. काहींना सुरूवातीला ऑफरप्रमाणं 44 लाख रुपये मिळाले देखील. मात्र जसजसे गुंतवणूकदार वाढले, तसे अॅपमधून पैसे मिळणं बंद झालं. अॅपमध्ये गुंतवललेले सगळे पैसे बुडाल्याचं लक्षात आल्यानंतर सोलापूरकरांचे डोळे उघडले. 

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनव्या आयडियांच्या कल्पना आणत असतात. आतापर्यंत पैसे दामदुप्पट करण्याच्या नादात लाखो लोक भीकपती झालेत. अशा आमिषांना बळी पडू नका, असं आवाहन पोलिसांनी पुन्हा केलंय. अलिकडेच विशाल फाटे स्कॅममध्ये अनेकजण रस्त्यावर आले. तरीही हजारो सोलापूरकर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पुन्हा एकदा फसले. पुढच्यांना ठेच लागूनही मागचे शहाणे व्हायला तयार नाहीत. याला काय म्हणायचं?