नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपवर निशाणा साधला होता. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना यांना यात्रा काढायच्या आहेत. जनता जगली काय?, त्यांचे प्राण गेले काय? त्यांना 100 टक्के राजकारण करायचं आहे अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेवर केली. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांना जन आशिर्वाद यात्रा किरकोळ वाटत होती, तर त्यांनी याची दखल का घेतली? मुंबई आणि कोकणात जनआशिर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आता हा बालेकिल्ला ढासळत चालला आहे यातूनच मुख्यमंत्री असं वक्तव्य करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
शिवसेना ही हिंदुत्ववादी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही. असं असतं, तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगवला आहे.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने नोटीस बजावत छापा टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की, सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावं की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.