एकनाथ शिंदे यांच्या 'सुरक्षा' संदर्भातील आरोपात कोणतेही तथ्य नाही - दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse Patil On Eknath Shinde Z + Security :  एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांना धमकी दिली गेल्यानंतर त्यांनी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली नाही. या आरोपातील हवाच दिलीप वळसे-पाटील यांनी काढली आहे.

Updated: Jul 23, 2022, 10:42 AM IST
एकनाथ शिंदे यांच्या 'सुरक्षा' संदर्भातील आरोपात कोणतेही तथ्य नाही - दिलीप वळसे-पाटील title=

पुणे : Dilip Walse Patil On Eknath Shinde Z + Security : नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांचा खून करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी केला. शिंदे यांना धमकी दिली गेल्यानंतर त्यांनी झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन सुरक्षा देऊ नका, असा गंभीर आरोप सुहास कांदे आणि शंभुराज देसाई यांनी केला होता. तसेच ठाकरे यांनी सुरक्षा दिली नाही, असे सूचक वक्तव्य सीएम शिंदे यांनी केले. याला आता तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. मुळात असं काहीही नाही. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. उच्चस्तरीय समितीच्या सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेत असते. तसेच त्यांनी तशी मागणी केलेली नव्हती, असे वळसे-पाटील म्हणाले.

नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही  एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला. त्याला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर देताना स्पष्ट केले की, राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.

सार्वजनिक जीवनात काम करताना अशा धमकीची पत्र येत असतात. याबाबत पोलीस तपास करतात. त्याचे गांभीर्यही लक्षात घेतले जाते. त्यानंतर चौकशी होते. या चौकशीनंतर उच्चस्तरीय समिती ठरवते. असे असले तरी  एकनाथ शिंदे यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी सुरक्षेची मागणी केली नव्हती. परंतु त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती.  शिंदेंना आलेल्या  धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे वळसे -पाटील यांनी म्हटले.

सुरक्षा देण्याचा निर्णय तज्ज्ञ समिती घेत असते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा धमक्या येत असतात. एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांनी पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच एकनाथ शिंदे यांना होती. एकनाथ शिदे आणि शंभुराजे देसाई एकाच गटाचे आहेत म्हणून ते आरोप करत आहेत, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, ठाकरे यांनी सुरक्षा दिली नाही?, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. गृहमंत्र्यांशी बोललात तर नक्की काय ते कळेल, शिंदे म्हणाले. नक्षली धमक्या आणि सुरक्षा वादाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुरक्षा वाढवणं हा गृहखात्याचा विषय आहे. नक्षली धमक्या येत असतात, त्यांचा परिणाम कामावर होत नाही, असेही शिंदे म्हणाले.

'मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही'

शंभूराजे देसाई असू किंवा मी असू हे निर्णय घेत नाही. एसआयडीचा रिपोर्ट  आल्यानंतर तशी सुरक्षा दिली जाते. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. रिपोर्ट पाहिला जातो आणि मग त्याबाबत निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.