Jayant Patil : अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. असे असताना अजित पवार वारंवार शरद पवार यांच्याशी संपर्क साधत आहे. शरद पवार यांना यांना सत्तेत सहभागी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या गटासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
'राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. सर्वांनाच शरद पवारांचं नेतृत्व मान्य आहे. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याचं सांगतात.. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणतीही फूट सध्यातरी दिसत नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत. शनिवारी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर जयंत पाटील यांनी हे विधान केल्याने याची जास्तच चर्चा रंगली आहे. कारण, जयंत पाटील यांनीच ही भेट घडवून आणली होती.
राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात तशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार सातत्याने शरद पवार यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार कधी आशिर्वाद घेण्यासाठी भेटल्याचे सांगतात. तर, कधी कौटुंबिक कारण देतात. सातत्याने अजित पवार यांना भेटत आहेत. शरद पवार यांनी सत्तेत सोबत यावे यासाठी अजित पवार प्रयत्न करत असल्याचे समजते. आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. यापुढंही पुरोगामी भूमिका घेऊनच पुढं जायचं आहे, असं ठाम मत पवारांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे.
सांगोल्यात दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी विधानभवनात गणपतराव देशमुखांचं स्मारक उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.