राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस; गुप्त भेटीनंतर कारवाई?

राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत.  भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Aug 13, 2023, 04:36 PM IST
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस; गुप्त भेटीनंतर कारवाई? title=

ED notice issued to Jayant Patil brother :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांचे  भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शनिवारी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्त भेट झाली होती. या भेटीनंतर ही भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

गुप्त भेटीबाबत जयंत पाटील यांचा खुलासा

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची देखील ईडी चौकशी झाली होती. आता भगतसिंग पाटील यांना देखील ईडीची नोटीस आली आहे. यामुळे आता दोघे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. शनिवारी अजित पवार आणि शरद पवारांच्यात झालेल्या बैठकीचा या कारवाईशी काही संबंध नाही अशी प्रतिक्रीया जयंत पाटील यांनी दिली आहे. 

कोण आहेत भगतसिंह राजाराम पाटील 

भगतसिंह राजाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे थोरले बंधू आहेत. सातारा मधील सैनिक स्कुल मधुन त्यांचे  शिक्षण पूर्ण झाले. तर, पुणे येथे त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ते मुंबईत वास्तव्य असून बांद्रा कुर्ला येथे कासेगाव शिक्षण संस्थेचे काम बघतात. तसेच त्यांचे इतर अनेक व्यवसाय सुरू आहेत. राजकारणा पासून ते नेहमी अलिप्त असतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची पुण्यात गुप्त भेट 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची पुण्यात भेट झाली होती. उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. जयंत पाटील यांनीच ही भेट घडवून आणली होती.  या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांसमोर काही प्रस्ताव मांडले मात्र शरद पवारांनी हे प्रस्ताव फेटाळल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीनं राजकीय वर्तुळात पुन्हा तर्क वितर्कांना उधाण आल आहे. 

जयंत पाटील यांची कोणत्या प्रकरणात झाली होती ED चौकशी

सांगलीच्या इस्लामपूरमधील राजारामबापू बँकेत इडीच्या पथकाने धाड टाकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक आहे. पारेख बंधू आणि अन्य काही व्यापा-यांवर ईडीनं छापे टाकले होते. त्या 15 व्यापा-यांच्या बँक खात्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली होती. IL अँड FS कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणात जयंत पाटील यांची चौकशी झाली होती.