...तर भाजपला पंकजा मुंडे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल - प्रीतम मुंडे

पंकजाताई अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Updated: Oct 11, 2019, 12:36 PM IST
...तर भाजपला पंकजा मुंडे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल - प्रीतम मुंडे title=

बीड: महाराष्ट्रात एखाद्या महिलेला मुख्यमंत्रीपदी करायचे झाले तर भाजपसमोर पंकजा मुंडे हा एकमेव पर्याय असेल, असे वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. त्या गुरुवारी बीड येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न यावेळी प्रीतम मुंडे यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना प्रीतम मुंडे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट उत्तर दिले. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करायचा झालाच तर पंकजाताई हा एकमेव पर्याय भाजपकडे असेल, असे प्रीतम यांनी म्हटले. त्यामुळे 'लोकांच्या मनातील मुख्यमंत्री' असणाऱ्या पंकजाताई अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय भाजपमधील अनेकांना रुचला नव्हता. यामध्ये एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे कायम आघाडीवर होती. पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र, मध्यंतरी चिक्की घोटाळ्यात नाव आल्याने पंकजा मुंडे अडचणीत आल्या होत्या. 

विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपावेळी देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना योग्य तो संदेश मिळाला होता. 

मात्र, यानंतरही परळी येथे झालेल्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी 'हमारी मुख्यमंत्री कैसी हो, पंकजा मुंडे जैसी हो', अशा घोषणा दिल्या होत्या. 

या प्रकारानंतर पंकजा यांनी तात्काळ खुलासा केला होता. दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु, मला याबद्दल काहीच ठाऊक नाही. किंबहुना मला कधीच मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा नव्हती. खरे तर विनोद तावडे यांनी तसे काहीतरी वक्तव्य केले होते. पण मी त्या वक्तव्याचा कधीच स्वीकार केला नाही, असे पंकजा यांनी सांगितले होते.