अंबरनाथमधील रेल्वेच्या धरणाची भिंत फुटली; भातशेती पाण्याखाली

धरणाची भिंत फुटल्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे

Updated: Jul 28, 2019, 05:15 PM IST
अंबरनाथमधील रेल्वेच्या धरणाची भिंत फुटली; भातशेती पाण्याखाली title=

अंबरनाथ : अंबरनाथमधील काकोळे गावातील जीआयपी धरणाची भिंत फुटल्याची घटना घडली आहे. धरणाची भिंत फुटल्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. हे धरण रेल्वेच्या मालकीचे आहे. या धरणावर रेल्वेचा रेल नीरचा प्रकल्प आहे. धरणाची भिंत कमकुवत झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

110 वर्षांपूर्वी रेल्वेचे जीआयपी धरण बांधण्यात आले होते. या धरणातून आधी रेल्वेला पाणीपुरवठा केला जात होता. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून हे धरण कोणत्याही पाण्यासाठी वापरले जात नव्हते. मात्र, आता रेल्वेने रेल नीर प्रकल्प या धरणावर उभारला आहे. दररोज जवळपास 2 लाख लीटर पाणी धरणातून उचलले जाते. 

आज दुपारी धरणाची संरक्षक भिंत फुटली. त्यामुळे धरण परिसरातील काकोळे गावातील शेतात धरणाचे पाणी शिरले. गावकऱ्यांनी वारंवार धरणाला गळती लागल्याचे सांगितले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भिंत फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.