नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरातील शनी चौकात पवार वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. यात खाली उभा असलेला रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या ठिकाणी राहत असलेल्या पाच कुटुंबातील २५ जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. वाडा कोसळण्याची यंदाच्या पावसाळ्यातील ही चौथी घटना आहे.
या वाड्याची एक भिंत कोसळल्यावर भिंतीचा संपूर्ण मलबा खाली उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला आहे. या इमारतीत ५ कुटुंब राहत होती. या कुटुंबातील २५ जणांना अग्निशमन दलाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.
या वाड्याला मोठे तडे गेले आहेत. हा वाडा पडण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून हा वाडा पाडण्याविषयीची तयारी सुरु केली आहे.