कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh) सभा चक्क एक तासात सभा गुंडाळली गेली. कोल्हापूर ( Kolhapur) जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा मोठ्या गोंधळात पार पडली. (The meeting of Gokul Dudh Sangh was wrapped up in one hour) विरोधकांनी सुरवातीपासून आपले मुद्दे लावून धरत सत्ताधाऱ्याना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताधारी संचालक मंडळाने विरोधकांच्या मुद्द्यांना बगल देत सर्व विषय मंजूर करत अवघ्या एक तासात सभा गुंडाळली. एकूणच काय सत्ताधारी नेत्यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर न देता सभा गुंडाळण्यात धन्यता मानली.
कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेमध्ये आजही अभूतपूर्व गोंधळ झाला.. अपेक्षेप्रमाणे गृहराज्यमंत्री सतेज पाटील समर्थकांनी सभेच्या सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत सुरुवातीला सीसीटीव्ही चा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू होताच गोकुळ दूध संघाचे एमडी घाणेकर हे मागील सभेचा इतिवृतांत कायम करण्याचा ठराव वाचायला सुरुवात केली, त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी नेत्यांवर प्रश्नांचा भडिमार सुरु केला.. गोकुळची मागील वार्षिक सभा झालीच नाही मग इतिवृतांत कायम करण्याचा प्रश्न येतोच कुठे असा मुद्दा उपस्थित केला आणि सत्ताधारी नेत्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
विरोधकांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी संचालक मंडळाने या प्रश्नाला बगल देत सभेचे कामकाज सुरू ठेवल. या गोंधळात गोंधळ म्हणून सत्ताधारी कार्यकर्त्यांनी मंजूर मंजूर अशा घोषणा देत सत्ताधारी नेत्यांच कामकाज सुरू ठेवायला मदत केली.. यावेळी एकीकडं सभेचे प्रभारी चेअरमन अरुण नरके हे सर्व प्रश्नांचे उत्तर दिल्याशिवाय सभा संपणार नाही अशी भूमिका मांडली, पण दुसरीकडे सभेचे कामकाज कसं गुंडाळता येईल हे देखील त्यांनी पाहिलं. विरोधकांचे मुद्दे, समर्थकांचे घोषणाबाजी यामध्ये सत्ताधारी नेत्यांनी मागील वर्षाप्रमाणे यंदाही गोकुळ दूध संघाची वार्षिक सभा गुंडाळली. इतकच नाही तर विरोधकांना फक्त गोंधळ घालायचा होता, त्यामुळे त्यांनी ते केलं असा आरोप प्रभारी चेअरमन अरुण नरके यांनी केलाय
कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र म्हणून गोकुळ दूध संघाला पाहिलं जातं याच गोकुळ दूध संघाची आजची सभा देखील वादळी होणार हे जवळपास निश्चित होतं आणि झालंही त्याचप्रमाणे. सत्ताधारी नेत्यांना सर्व विषय मंजूर करून सभा गुंडाळायची होती तर दुसरीकडं विरोधकांना आपले मुद्दे उपस्थित करून सत्ताधारी नेते कशाप्रकारे सत्तेचा दुरुपयोग करतात हे अधोरेखित करायचं होतं. सत्ताधारी आणि विरोधात हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचे उपस्थित सभासदांना अनुभवायला मिळाल. त्यामुळे सभासद असणारा सामान्य दूध उत्पादक शेतकरी आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी राहतो की विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पुढे करत सत्ता उलथवून लावतो हे आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.