कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांच्यामध्ये केवळ दोन खुर्च्यांचेच अंतर आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राणे यांनी १२ वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला. राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. कायम राणे हे टीका करत आहेत. आज एकाच व्यासपीठावर दोन्ही नेते येत आहेत. त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्ताने व्यासपीठावरील आसनव्यवस्था करण्यात आलेय. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या फक्त दोन खुर्च्यांचेच अंतर आहे.उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यामध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची आसनव्यवस्था आहे.
दरम्यान, नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झालेय. कार्यक्रमस्थळी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्या जोरदार घोषणा होत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात युतीकडून आणि काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.