भटक्या कुत्र्यांची दहशत; माणसांवर खुनी हल्ले

शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे.   

Updated: Mar 4, 2021, 06:26 PM IST
भटक्या कुत्र्यांची दहशत; माणसांवर खुनी हल्ले title=

कोल्हापूर : भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरल्यामुळे कोल्हापूरमधील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्याचा त्रास नागरिकांना विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड गावामधील भटके कुत्रे माणसांवर चक्क खुनी हल्ले करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अख्खं गाव कुत्र्याच्या दहशतीखाली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासन या कुत्र्यांना पकडण्यासाठी योग्य उपाय करत नाही. त्यामुळे यापुढे हल्ला करणा-या कुत्र्यांना ठार मारू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

दिवसाढवळ्या भटके कुत्रे लहान मुलं त्याचबरोबर वृद्धांवर देखील हल्ले करत आहेत. रात्री शेतात जाताना महिलांना भटक्या कुत्र्यांमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.  शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्यामुळे धोका वाढला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 

दरम्यान, कुत्र्याने आठ ते ११ वयोगटातील चिमुकल्यांना जखमी केले आहे. त्यामुळे रहिवाशांनी मोकाट कुत्र्यांची धास्ती घेतली आहे.  कुत्र्यांच्या दिवसागणिक वाढत असलेल्या खुनी हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.