महाराष्ट्रात पुन्हा स्टँप पेपर घोटाळा, या करोडोंच्या घोटाळ्यामागचा 'तेलगी' कोण?

स्टँप वेंडर आणि महसूल कर्मचा-यांच्या संगनमतानं करोडोंचा घोटाळा?

Updated: Mar 4, 2021, 05:53 PM IST
महाराष्ट्रात पुन्हा स्टँप पेपर घोटाळा, या करोडोंच्या घोटाळ्यामागचा 'तेलगी' कोण? title=

योगेश खरे, नाशिक : अब्दुल करीम तेलगीच्या स्टँप पेपर घोटाळ्यासारखाच आणखी एक मोठा घोटाळा नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. जमीन मालकांना अंधारात ठेवून स्टँप पेपरच्या आधारे कोट्यवधी रुपयांच्या जमिनी परस्पर लाटण्यात येत आहेत.

स्टँप वेंडर आणि महसूल कर्मचा-यांच्या संगनमतानं करोडोंचा घोटाळा

तुमची जमीन किंवा मालमत्ता असेल तर सावधान... कारण राज्यात पुन्हा तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यासारखाच नवा घोटाळा समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तहसील कार्यालयात दुय्यम निबंधक कार्यालयात काम करणारा हा स्टँप वेंडर चंद्रकांत ऊर्फ गोटू वाघ.. कधीकाळी सर्वसामान्य असलेला चंद्रकांत वाघ आज कोट्यधीश झालाय. तुमची मालमत्ता यानं स्वतच्या नावावर वळती केलीय ... ती कशी..? हा घोटाळा झाला तरी कसा? हेच झी २४ तास तुम्हाला दाखवणार आहे. दाखवणार आहे या नव्या स्टँप घोटाळ्याचा तेलगी कोण...?

२००२ सालचा तेलगी स्टँम्प घोटाळा तुम्ही अजून विसरला नसाल... ५००० कोटीच्या या घोटाळ्याची पाळंमुळंही नाशिक आणि परिसरातच रोवली गेली होती. झी मिडीयानचं हा घोटाळा समोर आणला होता आणि आता सुमारे २० वर्षानंतर पुन्हा त्याच मार्गानं स्टँप पेपर घोटाळा सुरू झाला आहे.

- एखाद्या माणसाच्या जमिनीचं खरेदीखत निबंधक कार्यालयातून काढलं जातं.
- त्याची झेरॉक्स काढून बनावट स्टँप पेपरच्या आधारे खरेदी खताची प्रत तयार केली जाते
- त्यावर मुद्रांक अधिका-याकडून सत्य प्रत असा शिक्का मारून घेतला जातो
- ऑनलाईन दुरुस्ती करून तलाठी कार्यालयात जमीन मालकी हक्काची नोंद बदलली जाते
- म्हणजे स्टँप पेपर नंबर तोच ठेवून बनावट स्टँप पेपरच्या आधारे करोडोंची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली जाते

याच पद्धतीनं चंद्रकांत वाघ यानं अनेक शेतजमीन मालकांच्या जमिनी हडप केल्या आहेत. या प्रकरणात कारवाई सुरु झाली आहे. मात्र पडद्यामागे अनेक बाबी दडवल्या जात आहेत. पोलीस ठोसपणे कोणतीही कारवाई करत नाहीत.
मात्र तक्रार आल्याचं मान्य करत आहेत.

या घोटाळ्यात ५० हजारांहून अधिक खरेदीखतांद्वारे जमिनी हडप केल्या गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. म्हणजे सुमारे ५०० ते १००० कोटीचा हा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे . महसूल यंत्रणा आणि निबंधक कार्यालयाच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचं बोललं जातं आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की तुमच्या जमिनीच्या खरेदी खताचीही खातरजमा करा.... तुम्हीही फसवले, ठगले गेला नाहीत ना..? 

देवळा तहसील कार्यालयाला वाघ बंधूंनी केलेला हा प्रकार म्हणजे हिमनगाचं टोक आहे निबंधक कार्यालयात वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या आजही फसवणूक सुरू आहे या सर्व पद्धतींचा मागवा झी24तास यापुढे घेत राहणार आहे.