एअर इंडियामधून 180 कर्मचाऱ्यांना नारळ, कंपनीने सांगितलं 'हे' कारण

Tata Groups Air India layoff: . एअर इंडियाने काही दिवसांपुर्वी 180 हून अधिक नॉन-फ्लाइंग कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2024, 07:00 AM IST
एअर इंडियामधून 180 कर्मचाऱ्यांना नारळ, कंपनीने सांगितलं 'हे' कारण title=
Air India layoff

Tata Groups Air India layoff: देशासह जगातील मोठमोठ्या कंपन्या संध्या मंदीच्या वातावरणातून जात आहेत. याचा फटका कर्मचाऱ्यांना बसताना दिसतो. जगातील अनेक बड्या कंपन्यांनी रातोरात कर्मचाऱ्यांना काढल्याचे वृत्त ताजे असताना यात आता एअर इंडियाच्या नावाची भर पडली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी वेदनादायक बातमी आहे. एअर इंडियाने काही दिवसांपुर्वी 180 हून अधिक नॉन-फ्लाइंग कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

टाटांनी जानेवारी 2022 घेतली विकत 

एअर इंडिया तोट्यात चाललेली असताना टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये विकत घेतली. तेव्हापासून देशातील विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या टाटा ग्रुपकडून एअर इंडियाचे बिझनेस मॉडेल सुव्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फिटमेंट प्रक्रियेचा एक भाग म्हणून नॉन-फ्लाइंग टास्कमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रता आणि संस्थात्मक आवश्यकतांवर आधारित जबाबदारी देण्यात आली होती. हे सर्व लोक स्वेच्छानिवृत्ती योजना आणि रि-स्किलिंगच्या संधींचा वापर करू शकले नाहीत, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.

जागतिक विमान कंपनी म्हणून स्थापनेची तयारी

180 हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवताना कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना व्हीआरएस किंवा रीस्किलिंगची संधी देण्यात आली होती. पण 1 टक्क्यांहून कमी लोक या संधीचा वापर करू शकले नाहीत. त्यामुळे आम्हाला त्यांना काढून टाकावे लागले, अशी माहिती देण्यात आली आहे.

कर्मचारी कपातीची  प्रक्रिया करताना आम्ही सर्व कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचेही प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. एअर इंडिया एक जागतिक विमान कंपनी म्हणून स्वत:ला स्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यादृष्टीने कंपनीकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. त्याचाच हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

180 कर्मचाऱ्यांना नारळ

समोर आलेल्या माहितीनुसार एअर इंडियाने कॅन्टीन सेवा, स्वच्छता आणि एसी सेवेतील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. एअरलाइनने किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले? याचा अधिकृत स्पष्ट आकडा सांगितला नाही. तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाने आपल्या 180 पेक्षा जास्त वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एअर इंडियामध्ये अंदाजे 18,000 कर्मचारी आहेत. कर्मचारी कपात करण्याची एअर इंडियाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 12 मार्च रोजी एअरलाइनने 53 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.