सोनू भिडे, नाशिक:-
मोबाईलचा अति वापर, पालकांचे दुर्लक्ष यामुळे आतापर्यंत अनेक लहान मुलांचे (Child) जीव गेले आहेत. कुठे गरम पाणी अंगावर पडून तर कुठे कॉइन गिळल्याने बालकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र आता मॅजिक बॉल (Magic Ball) गिळल्याने दिड महिन्याच्या बालकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत मृत मुलाच्या आईने वडिलांच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
काय आहे घटना
नाशिक स्थित संकेत प्रवीण बोराडे यांच्यासोबत शीतल हिचा विवाह २०१८ साली झाला होता. लग्नाच्या पाच ते सहा महिन्यांनंतर दोघांमध्ये मतभेद सुरु झाले होते. लग्नानंतर शीतल प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. १५ ऑक्टोबर २०२० रोजी शीतलने गोंडस मुलाला जन्म दिला. काही महिन्यानंतर सासरच्यांनी शीतलला सासरी आणले. मात्र दोघांमधील मतभेद संपले नव्हते. कौटुंबिक वादानंतर न्यायालयात पती-पत्नीचे समुपदेशन केल्यानंतर ते मोटवानीरोड भागात शांतीकृपा सोसायटीत राहत होते. मुलाचे वडील संकेत यांनी शिवांश याला खेळण्यासाठी छोटा पिवळ्या रंगाचा मॅजिक बॉल आणला. १२ मे २०२२ रोजी आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली असताना आणि वडील घरात कामात मग्न असताना शिवांशने मॅजिक बॉल गिळल्याने त्याची प्रकृती खालावली. शीतल घरी आल्यानंतर शिवांश पलंगावर पडलेला आईला दिसला. यानंतर आई वडिलांनी (Mother, Father) शिवांशला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या आईने वडिलांवर केला गुन्हा दाखल
संकेतने वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. छोट्या वस्तूंचा लहान मुलांना धोका असल्याची जाणीव संकेतला होती. तरीही अठरा महिन्यांच्या मुलाला छोटा मॅजिक बॉल खेळण्यास देऊन तो बॉल मुलाने गिळला तर त्याचा मृत्यू (Death) होऊ शकतो, याची माहिती असतानाही मॅजिक बॉल मुलाला खेळण्यास देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत मुलाच्या आईने नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात (Police Station) मुलाच्या वडिलांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.