Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला राज्यभरात दणक्यात सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनमध्ये झालेल्या बिघाडामुळं मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं.
इथं राज्यात विधानसभेसाठी मतदानाची धामधूम असतानाच मतदानाच्याच दिवशी सकाळीच महाडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बिरवाडी शहराच्या नाक्यावर रस्त्याच्या मधोमध, तिन रस्ते एकत्र येत असलेल्या तिठ्यावर एकावर एक दोन मडकी आणि त्यावर नारळ ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
मडक्यांची तोंडं लाल आणि काळ्या फडक्याने बांधून ठेवण्यात आली होती. हा देव देवस्कीचा प्रकार असल्याचा संशय प्रथमदर्शनी अनेकांनीच व्यक्त केला. सदर प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. हा प्रकार कुणी केला असावा याचीच चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
मतदानाच्या दिवशी एकिकडे महाडमध्ये देवदेवस्कीसम प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलेलं असतानाच राज्यातील काही मतदार संघांमध्ये मतदारांनी मतदानाच्या हक्कावर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं. तर, काही ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडानं मतदारांना पश्चाताप सोसावा लागला.
पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद असल्याचं वृत्त समोर आलं. अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम पाऊण तासापासून बंद असून, तांत्रिक बिघाडामुळं ईव्हीएम बंद झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती. तिथं येवल्यात जनता विद्यालय येवला या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीच यंत्रात बिघाड झाला होता. मुंबईतही शिवडी मतदार संघातील आर.एम. भट शाळेतील मतदान केंद्रावर असंच चित्र पाहायला मिळालं.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मतदान केंद्रांकडे जात असतानाच तिथं कोकणाच्या दिशेनं निघालेल्या वाहनांचा आकडाही मोठा असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई- गोवा महामार्गावर बुधवारी पहाटेपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचं लक्षात आलं.