प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : बेकायदा पद्धतीने चीनच्या १० नौका भारतीय हद्दीत घुसल्या आहेत. हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्यामुळे चीनी नौकांवर बंदी घालावी आणि याची सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र शिवसेना खासदार विनायर राऊत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लिहिले आहे.
चीनमधून दाभोळ येथे आलेल्या ८ बोटी अपुऱ्या कागदपत्रांमुळे अजूनही दाभोळ बंदरापासून सुमारे १० नॉटिकल अंतरावर उभ्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बोटी मासेमारीसाठी वापरल्या जातात. बोटीचे मेंटनन्स करण्यासाठी एका एजंटच्या माध्यमातून दाभोळ येथे आल्या होत्या. मात्र दाभोळ बंदरात येण्याआधी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्यामुळे या बोटींना प्रवेश नाकारण्यात आला होता. अद्यापही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे या बोटी समुद्रातच उभ्या आहेत. त्यातच या बोटींना वायू वादळाचा देखील फटका बसल्याचे बोललं जातं आहे.
या अगोदर देखील अशाच दोन बोटी या दाभोळच्या बंदरात आल्याने सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली होती. त्यातील एका बोटीवरून सॅटेलाईट फोनचा वापर केला गेला. या दोन संशयित बोटींची कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. त्यात प्रथमदर्शनी कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही.
आंतरराष्ट्रीय समुद्रात मासेमारी करणाऱ्या चीनच्या १० बोटींनी कोकण किनारपट्टीवरील दाभोळ बंदराचा आश्रय मागितला आहे. १० पैकी दोन बोटी मागच्या मंगळवारी किनाऱ्यावर दाखल झाल्या असून कोस्टगार्डसह स्थानिक पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तर त्यानंतर अजून ८ बोटींनीही बंदरात आश्रय मागितल्याचे वृत्त आहे. दाभोळ बंदरापासून सुमारे १० नॉटिकल अंतरावर या बोटी उभ्या आहेत. मात्र याबाबत कोस्टगार्डसह बंदर विभाग, पोलीस यंत्रणा या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेऊन आहे.