चाऱ्याच्या टंचाईमुळे गुरांची कवडीमोल भावात विक्री; स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन

शासनाने जनावरे योग्य दराने खरेदी करावीत

Updated: Jul 26, 2019, 06:07 PM IST
चाऱ्याच्या टंचाईमुळे गुरांची कवडीमोल भावात विक्री; स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी लातूर-बार्शी महामार्गावर  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथील करकट्टा येथे हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

लातूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालाय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, खरीपाचा विमा १००% द्यावा, शेतकऱ्यांचे वीज बिलही माफ करावे, जनावरांचा चारा छावणीला नाही तर दावणीला द्यावा, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना त्यांची जनावरे चाऱ्याभावी कवडीमोल भावात विकावे लागत आहेत. त्यामुळे शासनाने जनावरे योग्य दराने खरेदी करावीत, अशी आगळी वेगळी मागणीही यावेळी करण्यात आली. 

जर सरकारने लवकरात लवकर चारा छावणीचा निर्णय न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनावरांचा 'स्वाभिमानी बाजार' भरविण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते सत्तार पटेल आणि जिल्हाध्यक्ष अरूण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  दरम्यान या रास्ता रोकोमुळे लातूर-बार्शी मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.