राज ठाकरेंच्या विचारांशी आम्हांला देणं घेणं नाही - राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाचं समर्थन केलं आहे.

Updated: Feb 9, 2020, 07:25 PM IST
राज ठाकरेंच्या विचारांशी आम्हांला देणं घेणं नाही - राजू शेट्टी title=
फाईल फोटो

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मनसे सोबत आम्ही जायचं की नाही हे मनसेच्या विचार सरणीवर अवलंबून आहे. याबबात आता काही सांगता येणार नाही, राज ठाकरेंच्या तलवारीला तलवारीने उत्तर देऊ या विचारांशी आम्हांला काही देणं घेणं नसल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

मनसेचा फक्त घुसखोरांना हकलायची मागणी असेल, तर आमची काही हरकत नाही त्यांना हकलायलाच पाहिजे अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चाचं समर्थन केलं आहे. मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या मनसे सोबत जायचं की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही, आमची भूमिका ही धर्मनिरपेक्ष असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत असताना, राज ठाकरे यांच्या तलवारीला तलवारीने उत्तर देऊ या विचारांशी आम्हांला काही देणं घेणं नसल्याचं शेट्टी म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) मोर्चे काढणाऱ्यांना आज आम्ही फक्त मोर्चा काढून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यापुढे जास्त नाटकं कराल तर दगडला दगडाने आणि तलवारीला तलवारीने प्रत्युत्तर देऊ, अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काढण्यात आलेल्या महामोर्चावेळी केली.

जगातील कोणत्याही देशात नसेल इतके स्वातंत्र्य आजघडीला भारतातील नागरिकांना मिळत आहे. मग तुम्ही तोच देश बरबाद मागे करायच्या मागे का लागला आहात? देशप्रेमी मुस्लिमांनी जागरूक राहून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, असेही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.