मुंबई : इंदोरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त इंदोरीकर महाराजांना चांगलच भोवलं आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होताच. आता कोर्टाने त्यांना समन्सही बजावलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर २६ जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.