झेडपी शाळेतल्या गुरुजींची कमाल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाईव्ह शिक्षण

औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी या अडचणीवर उपाय शोधला

Updated: Mar 11, 2021, 10:24 PM IST
झेडपी शाळेतल्या गुरुजींची कमाल, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाईव्ह शिक्षण title=

विशाल करोळे, औरंगाबाद : लॉकडाऊन हटल्यानंतर शहरातल्या शाळा ऑनलाईन का होईना, सुरू झाल्या.. पण ग्रामीण भागात ऑनलाईन शाळा कशा सुरू करायच्या, ही मोठीच अडचण होती. औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी या अडचणीवर उपाय शोधला... काय केलं या गुरुजींनी? 

गरज ही शोधाची जननी असते. शाळेतल्या फळ्यावरचा हा सुविचार जिल्हा परिषद शाळेतल्या गुरुजींनी प्रत्यक्षात खरा करून दाखवला. ग्रामीण भागातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं, असा मोठा प्रश्न जिल्हा परिषद शाळांमधल्या मास्तरांना पडला. राज्यभरातले तब्बल 400 शिक्षक ऑनलाईन एकत्र आले. आणि त्यांनी जन्माला घातलं एक आगळंवेगळं कमालीचं अॅप... झेडपी लाईव्ह....

झेडपी लाईव्ह अॅपमध्ये 1 ली ते 10 वीचे सगळे धडे अपलोड केले आहेत. धडे शिकवणा-या शिक्षकांचे व्हिडिओही त्यात आहेत. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यात खास गंमत शाळाही आहे. गणित, मराठी, इंग्रजी अशा सगळ्या विषयांची पुस्तकं, ऑडिओ बुक्स आणि व्हिडिओ त्यात आहेत.

ग्रामीण भागातील मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीच झेडपी शाळेतल्या शिक्षकांची ही सगळी धडपड असल्याचं गुरुजी सांगतात. झेडपी लाईव्हची ही आयडियाची कल्पना पालकांनाही आवडलीय. अॅपमुळं मुलांना अभ्यासाची गोडी लागत असल्याचं पालक सांगत आहेत. ऑनलाईन व्हिडिओंच्या माध्यमातून औरंगाबादच्या वरवंडी तांड्यावरची मुलं थेट जर्मन भाषा शिकली. त्याचे व्हिडिओ या अॅपमध्ये अपलोड केल्यानं इतर मुलांनाही आता परदेशी भाषांचे धडे मिळत आहेत.

सोलापूरच्या झेडपी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कारानं अलिकडंच गौरवण्यात आलं. पण असे डिसले गुरुजी प्रत्येक झेडपीच्या शाळेत आहेत, हेच या झेडपी लाईव्ह अॅपमुळं दिसलं.