या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, पुढील तीन दिवस राज्यावर अवकाळी संकट

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात जोरदार गारपीट झाली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Updated: Mar 19, 2021, 11:12 AM IST
या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस, पुढील तीन दिवस राज्यावर अवकाळी संकट title=

अमरावती, नांदेड : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात जोरदार गारपीट झाली. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नांदेडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच वाशिम जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला. (Strongly Rain in Amravati, Nanded, Washim )

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात तुफान गारपीट झाली. विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात ही गारपीट झाली. गारपीटीमुळे चिखलदरा येथील पंचबोल पॉइंटवर गारांचा खच पाहायला मिळाला. गारपीटीमुळे या भागात काश्मीर सारखं वातावरण निर्माण झाले होते.

नांदेडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. काल सायंकाळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर रात्री रिमझिम पाऊस झाला. नांदेडसह काही तालुक्यात हा पाऊस पडला. रिमझीम पावसामुळे कापणीला आलेल्या गव्हाचं नुकसान झाले. आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात  मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाला. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मात्र रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेल्या गहू, हरबरा पिकासह, भाजीपालासह फळबाग पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.