अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात सध्या मोकाट जनावरांची दहशत आहे. कधी बेसावध क्षणी तुमच्यावर मोकाट बैल हल्ला करतील याचा नेम नाही. मुंबईतल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यावर असाच मोकाट बैलांनी हल्ला केला आहे.
मुंबईतल्या पवई आयआयटीसमोर अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. आयआयटीच्या गेटसमोर दोन बैलांची झुंज सुरू होती. याचवेळेस अक्षय लता हा विद्यार्थी रस्त्याशेजारी उभा होता. झुंज सुरू असताना दोन्ही बैल अचानक अक्षयच्या अंगावर आले. बैलाच्या बसलेल्या धडकेत अक्षय जागीच बेशुद्ध झाला. यापूर्वीही एका विद्यार्थ्यावर बैलानं हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मोकाट बैलांच्या झुंजी आपल्यासाठी नव्या नाहीत यापूर्वीही अशा झुंजी झाल्या आहेत. एका ठिकाणी तर झुंज सुरू असताना दोन दुचाकीस्वारांनी तिथून पळ काढला. तिसरा दुचाकीस्वार तिथं आला. त्याला झुंजणारे बैल अंगावर येत असताना दिसले. तो पळून जात असताना बैलाची जोरदार धडक त्याला बसली. दुसऱ्या एका घटनेत दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली.
एका कॉलनीत तर बैलानं दुचाकीस्वाराच्या अंगावर उडी मारली. बाजारात चाललेल्या एका महिलेना बैलानं आकाशात अलगद उडवलं. दुसऱ्या एका घटनेत बैलाला आणण्यासाठी गेलेल्या मालकावर बैल तुटून पडला. एकदा नव्हे तर दोन तिनदा त्यानं मालकाला धडक दिली.
नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये तर दोन बैल भररस्त्यात भिडले होते. या बैलांमुळे वाहतूकही थांबली होती. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी बैलांवर पाण्याचा फवारा सोडून बैलांना पळवून लावलं होतं. मोकाट जनावरं आपण रस्त्यात ठिकठिकाणी पाहतो. पण ही जनावरं तितकीच धोकादायक आहेत हे या प्रकरणामुळं अधोरेखित झालं.