चेतन कोळस, येवला, नाशिक : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. (power outage) सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता. (stopped for six hours Power supply to Vavi and Pathare sub stations) तो सुरळीत करण्यासाठी कर्मचारी योगेश वाघ यांना 70फूट तलाव पोहून जावं लागलं. त्यानंतर त्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. समृद्धी महामार्गासाठी केलेल्या खोलीकरणामुळे तलावात सुमारे वीस फूट खोल पाणी आहे. त्यातून पोहून जात त्यांनी वीजपुरवठा सुरु केल्यानं त्यांच्या धाडसाचं कौतुक होतं.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोलीकरणामुळे तलावात सुमारे वीस फूट खोलीपर्यंत असणारे पाणी या पाण्यातून मार्ग काढत सुमारे 70 फूट अंतर पोहून जात मुख्य वीज वाहिनीवर असणारा बिघाड दूर करत सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी व पाथरे या दोन उपकेंद्रांचा सहा तास बंद झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे धाडस योगेश बापू वाघ या कर्मचाऱ्याने दाखवले.
शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला होता. हा बिघाड शोधण्यासाठी दोन्ही उपकेंद्रांचे कक्ष अभियंता अजय सावळे व हर्षल मांडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सिन्नर ते वावी दरम्यान असलेल्या मुख्य वीज वाहिनीवर पेट्रोलिंग करत होते. काही कर्मचारी सिन्नरच्या बाजूने तर काही कर्मचारी वावीच्या बाजूने दापूर पर्यंत पेट्रोलिंग करत येत असताना गोंदे शिवारात असलेल्या गोंद नाल्यावर पाझर तलाव क्षेत्रात असलेल्या खांबावर बिघाड असल्याचे लक्षात आले.
या ठिकाणी तीन पैकी एका खांबावर कट पॉईंट असल्याने त्याच ठिकाणी बिघाड झाला होता. बिघाड सापडला पण तो दुरुस्त करायचा म्हटले तर चहुबाजूनी पाण्याने वेढलेल्या खांबापर्यंत जायचे कसे हा प्रश्न सर्वांसमोर होता. कारण समृद्धी महामार्गासाठी या तलावातील मातीचा उपसा करण्यात आल्याने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार वीस फूट खोलीपर्यंत पाणी होते. तलावाच्या काठापासून विजेच्या खांबाचे अंतर सुमारे 70 फूट इतके होते. तिथपर्यंत पोहोचायचे म्हटले तर एवढ्या लांबीची शिडी देखील नाही. अशावेळी मूळचा मीठसागरे येथील रहिवासी आणि वावी,पाथरे उपकेंद्रात कार्यरत असलेला कर्मचारी योगेश बापू वाघ पुढे आला.
मला चांगले पोहता येते. बिघाड दुरुस्त करण्यासाठी मी पाण्यातून पोहत खांबापर्यंत जातो. असे म्हणत त्याने उभय अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. मात्र,पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने परवानगी द्यायची कशी असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला. सिन्नर ग्रामीण - 2 चे उप अभियंता ऋषिकेश खैरनार यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. वीजपुरवठ्यातील बिघाड दूर होणे गरजेचे असले तरी कर्मचाऱ्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत खैरनार यांनी योगेशच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्याची सूचना केली. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांकडून तीन-चार मोठे दोर आणण्यात आले. हे दोर योगेशच्या कमरेला सुरक्षेसाठी बांधण्यात आले.
दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास योगेश पाण्यात उतरला. खांबापर्यंतचे अंतर सराईतपणे पोहून जात त्याने बिघाड झालेल्या खांबावर आरोहण केले. तेथील बिघाड दुरुस्त करायला त्याला एक तासाचा अवधी लागला. दुरुस्तीचे काम फत्ते केल्यावर पुन्हा आल्या मार्गाने पाण्यातून मार्गक्रमण करत तो सुरक्षित बाहेर आला. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वावी आणि पाथरे येथील उपकेंद्रांचा तब्बल सहा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे.