औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गर्दी होत असलेल्या भागांत लॉकडाऊनचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिलेत. शहरातील जाधववाडी मंडी, गुलमंडी बाजार, कॅनॉट परिसर या भागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं आयुक्त म्हणाले. पुढचे काही दिवस इथली रुग्णसंख्या वाढत राहिली तर हे भाग बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं. संपुर्ण शहरात लॉकडाऊन होणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.
औरंगाबादमधील गर्दीच्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा स्थानिक प्रशासनाचा विचार आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, जाधवमंडी या भागात मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले जावू शकतात. गेल्या 24 तासांमध्ये औरंगाबादमध्ये 371 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यांत नवीन रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण आता औरंगाबादमध्ये ही रुग्ण वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
राज्यात वाढत जाणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधीच लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्याचे संकेत याआधी ही सरकारकडून देण्यात आले आहेत.