'तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार' ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

सरकार आणखी किती आत्महत्यांची वाट पाहतंय, आंदोलक कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल

Updated: Feb 26, 2022, 02:27 PM IST
'तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार'  ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, उस्मानाबाद : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा', या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आता तीन महिने होत आले तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. या मागणीवर निर्णय होईपर्यंत संप कायम ठेवण्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या
या तीन महिन्यांच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज उस्मानाबादमध्ये आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आपलं जीवन संपवलं. हनुमंत चंद्रकात आकोसकर असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. हनुमंत यांच्या आत्महत्यने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नैराश्यातून आत्महत्या
हनुमंत आकोसकर तुळजापूर डेपोमध्ये वाहक म्हणून काम करत होते. विलीनीकरणासाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी ते रोजंदारी काम करत होते .आंदोलनाला शंभर दिवस उलटले तरी मार्ग निघत नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. घरचा खर्च कसा भागवायचा, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणयाचा या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. अखेर याच नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. 

संपकरी कर्मचारी आक्रमक
हनुमंत आकोसकर यांच्या मृत्यूची बातमी कळताच. संपकरी आंदोलकांनी त्यांच्या घराजवळ धाव घेतली. आकोसकर यांचा मृतदेह उस्मानाबद डेपोतील आंदोलनस्थळी आणत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. आणखी किती कर्मचाऱ्यांचा सरकार जीव घेणार असा संतप्त सावर कर्मचाऱ्यांनी सरकारला विचारला.

अधिकाऱ्यांनी दिलं मदतीचं आश्वासन
तीन ते चार तास आकोसकर यांचा मृतदेह आंदोलनस्थळी ठेवण्यात आला होता. यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी भेट देत अकोसकर यांच्या कुटुंबियांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यानंतर हनुमंत आकोसकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी एस टी डेपो मध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसंच आकोसकर कुटुंबीयांचे सांत्वन केल. सरकार एसटीच्या विलीनीकरणासाठी गंभीर नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. आमदार पाटील  वगळता  जिल्ह्यातील  एकाही नेत्यान अकोसकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही.या बद्दल एस टी कर्मचाऱ्यांत नाराजी आहे .