रत्नागिरी : जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे. डिझेलचे पैसे भरले नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगण्यात येते आहे. एसटी विभागाच्या या सावळ्यागोंधळामुळे महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांना बराचवेळ एसटी स्थानकावर ताटकळत उभे रहावे लागल आहे. एकूणच या गोंधळाबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तर एसटीच्या रत्नागिरी विभागाकडे डिझेलचे बिल भरायला पैसेच नव्हते, अशी माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात एसटीची सेवा ठप्प झाल्याने कॉलेज, शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घर गाठण्याची नामुष्की ओढावली आहे. अनेक वयोवृध्दांना बसस्टॉपवर ताटकळत राहावे लागले. तर कामासाठी बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. रत्नागिरी शहर बसस्थानकातून दोन दिवसांत ३४६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर ग्रामीणच्या ९३ फेऱ्या रद्द केल्या गेल्या. शहर बसनेच विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते, डिझेल नसल्याने येथील डेपोत सर्व बसेस एका रांगेत लावून ठेवण्यात आल्या होत्या.
डिझेल नसल्याने एसटीचे चालक-वाहक डेपोत आणि बसस्थानकात बसून होते. रत्नागिरीतच डिझेलची समस्या नसून विभागातील बहुतांश डेपोमध्ये ही परिस्थिती सध्या वारंवार निर्माण होत आहे. डिझेलचे पैसे न दिल्याने ही समस्या निर्माण झाली होती, अशी माहिती अधिकारी वर्गांकडून देण्यात आली. डिझेलचे पैसे दररोजच्या रोज द्यावे लागता. यावेळी पैसे देण्यास एक दिवस उशीर झाला, त्यामुळे डिझेल टँकर आले नाहीत. पैसे भरल्याशिवाय डिझेल पुरवठा केला जात नाही. मात्र विभागाकडे रक्कमच नव्हती. त्यामुळे एक दिवस पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.