मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, सागली, जालना या जिल्ह्यांमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.
अमरावती
अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.
अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाल्याची माहिती मिळत असून जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
जालना
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अंबडमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
सांगली
जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरज मध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.
पुणे
पुणे जिल्हात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले
उद्या पुणे शहरातील स्वारगेट ,शिवाजीनगर ,भोर ,बारामती बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उस्मानाबाद
उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एक ही बस डेपोबाहेर आली नाही.