SSC Passing Marks for Maths Science: शाळेत असताना भल्याभल्या हुशार विद्यार्थ्यांची गणित, विज्ञानामध्ये दांडी गुल होते. त्यामुळे गणित, विज्ञान विषयाला घाबरणारे खूप जण असतात. अनेक विद्यार्थी तर बाकीच्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात पण त्याना गणित आणि विज्ञान विषयात 35 गुणही मिळवता येत नाहीत. आता या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा नियम आणण्यात आलाय.
गणित आणि विज्ञान विषयात दांडी गुल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. 100 गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 35 गुणांची गरज असते. पण आता तुम्हाला 35 ऐवजी 20 गुणांची गरज लागणार आहे. सरकारने एसएससीमधील या दोन्ही विषयांचे उत्तीर्ण गुण 100 पैकी 35 वरून 20 वर आणले आहेत. असे असले तरी यासोबत एक नियमही आहे. वास्तविक जे विद्यार्थी या पद्धतीने उत्तीर्ण होतील. त्यांच्या मार्कशीटमध्ये एक नोटदेखील असेल. ज्यामध्ये ते पुढे गणित किंवा विज्ञानाचा अभ्यास करू शकत नाहीत, असे त्यात लिहिलेले असेल.स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संचालक राहुल रेखावार यांनी या संदर्भात माहिती दिली. 'हा बदल शालेय शिक्षण विभागाने आधीच मंजूर केलेल्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याचा भाग आहे, असे ते म्हणाले. असे असले तरी हा बदल राज्यात नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर अंमलात येईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांना ह्युमॅनीटीज किंवा कला शाखेची आवड आहे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणित किंवा विज्ञानात नापास होऊन विद्यार्थ्यांचे वर्ष फुकट जाते. यानंतर विद्यार्थ्यांकडे क्षमता असली तरी पुढील अभ्यासासाठी कोणताही पर्याय उरत नाही. तसेच दहावीला अनुत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षण अर्धवट सोडणारे किंवा सोडायला भाग पाडणाऱ्या घटनाही गाव खेड्यात जास्त प्रमाणात घडतात. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकले जाणार नाहीत, यासाठी बदल डिझाइन करण्यात आले आहेत. जेणेकरुन विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहून आपल्या करिअरच्या आकांक्षा पूर्ण करू शकणार आहेत.
20 गुण मिळवून विद्यार्थी गणित, विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊ शकतील. असे असले तरी संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ते पुढील वर्षी पूरक परीक्षा किंवा नियमित परीक्षा देऊ शकणार आहेत. या विषयात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नवीन गुणपत्रिका मिळू शकते, अशी माहितीदेखील रेखावार यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाच्या या निर्णयावर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांना हा निर्णय आवडलाय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय. अशा प्रकारच्या निर्णयामुळे शैक्षणिक दर्जाशी तडजोड केली जात असल्याची टीकादेखील समाज माध्यमांतून केली जात आहे.