अहमद शेख / सोलापूर : कोरोनामुळे अख्खं जग ठप्प पडले आहे. अशामध्ये साहजिकच स्कूलबस धारकही भरडले गेले. मात्र आता त्यांना चिंता सतावत आहे ती कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या आणि बँकांनी सुरू केलेल्या तगाद्याची. सोलापुरातले स्कूलबस धारक त्यामुळे धास्तावले आहेत.
कोरोनामुळे स्कूलबसना ब्रेक लागला आहे. त्यात कर्जवसुलीसाठी बँका आणि फायनान्स कंपन्यांचा मात्र तगादा. घर कसं चालवायचे, हप्ते कसे फेडायचे, अशी चिंता सोलापुरतील स्कूलबस धारकांना पडली आहे.
रिक्षाचालक वडिलांच्या पैशांतून घर चालत नव्हतं, म्हणून पूजा डेरी हिनं बँकेकडून कर्जावर स्कूल बस घेतली. मात्र कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि पूजाच्या उत्पन्नालाही ब्रेक लागला. पूजाकडे आता घर चालवायलाही पैसे नसताना, बँकवाले हप्त्यासाठी तगादा लावत आहेत.
स्कूलबस मालक राजेश सातपुते यांना त्यांच्या कोरोनाग्रस्त वडिलांवर उपचार करायलासुद्धा पैसे नाहीत. इतकी भयानक परिस्थिती राजेश सातपुते यांची आहे. तरीदेखील फायनान्स कंपन्या आणि बँका हप्त्यांसाठी त्यांना सतत विचारत आहेत.
एकट्या सोलापूर जिल्ह्यातले जवळपास सातशेहून अधिक स्कूलबस धारक, सध्या बेरोजगार आहेत. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत बँकांनी कर्जवसुलीसाठी सतावू नये इतकीच माफक अपेक्षा ते व्यक्त करताहेत.
कोरोनामुळे सर्वांचीच वाईट अवस्था सध्या झालीआहे. मात्र बँका आणि फायनान्स कंपन्यांना हे मान्य नाही. अशा परिस्थितीत थोडं सबुरीने घेण्याची गरज आहे.
6\